Sunday , September 20 2026
Breaking News

गणपती भाड्याने! बेंगळूरमध्ये उत्सवाची नवी संकल्पना

Spread the love

 

भव्य मूर्तीची हौसही भागणार; पर्यावरणपूरक विसर्जनाचाही मार्ग मोकळा

बेंगळूर : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमत असताना बेंगळूरमध्ये यंदाचा गणेशोत्सव एका अनोख्या प्रयोगामुळे चर्चेत आला आहे. गणेशमूर्ती विकत घेण्याऐवजी ती चक्क भाडेतत्त्वावर घेण्याची नवी संकल्पना येथे आकाराला आली आहे. मोठ्या आकाराची भव्य मूर्ती प्रतिष्ठापित करण्याची मंडळांची इच्छा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज यांचा अनोखा मेळ या उपक्रमातून साधला जात आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला की भव्य मूर्ती, आकर्षक सजावट, रोषणाई आणि विविध सांस्कृतिक उपक्रम अशी उत्सवाची बदलती ओळख निर्माण झाली आहे. मात्र मोठ्या मूर्ती खरेदी करण्यासाठी होणारा खर्च, त्यांची वाहतूक आणि विसर्जनाची समस्या यामुळे अनेक मंडळांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यातच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणाला होणारे नुकसान लक्षात घेता पर्यावरणपूरक मूर्तींचा आग्रह वाढत आहे.

याच पार्श्वभूमीवर बेंगळूरमधील काही व्यापाऱ्यांनी फायबरच्या मोठ्या गणेशमूर्ती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा अभिनव मार्ग स्वीकारला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आपल्या गरजेनुसार एक, तीन किंवा पाच दिवसांसाठी या भव्य मूर्ती भाड्याने घेता येतात. आकारमानानुसार या मूर्तींसाठी दिवसाला सुमारे ३० हजार रुपये भाडे आकारले जाते.

उत्सवाची सांगता झाल्यानंतर फायबरची मूर्ती संबंधित व्यापाऱ्यांकडे परत केली जाते. त्यामुळे मोठी मूर्ती खरेदी करून ती साठवून ठेवण्याचा किंवा पुढील वर्षी तिचे काय करायचे, हा प्रश्न मंडळांसमोर राहत नाही. विशेष म्हणजे, भव्यतेची ही हौस पूर्ण करतानाच पर्यावरणाचा समतोल राखण्याचीही काळजी या व्यवस्थेत घेण्यात आली आहे.

भव्य मूर्ती सोबत मातीचा बाप्पाही!

या संकल्पनेचे सर्वाधिक लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे फायबरच्या भव्य मूर्तीसोबत मातीची गणेशमूर्ती विनामूल्य दिली जाते. सार्वजनिक दर्शन आणि उत्सवासाठी फायबरची मोठी मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते; तर धार्मिक विधींसाठी मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तीची पूजा केली जाते. उत्सवानंतर या मातीच्या मूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले जाते.

यामुळे एका बाजूला मंडळांची ‘मोठा गणपती बसविण्याची’ इच्छा पूर्ण होते, तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणपूरक विसर्जनालाही प्राधान्य दिले जाते. विशेषतः युवा गट, सामाजिक संस्था आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून या संकल्पनेला वाढता प्रतिसाद मिळत आहे.

उत्सवात भव्यता; विसर्जनात पर्यावरणाची जपणूक

गणेशोत्सवाच्या बदलत्या स्वरूपात भव्यतेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा विचार रुजविण्याची गरज निर्माण झाली आहे. बेंगळूरमध्ये सुरू झालेली ही भाडेतत्त्वावरील गणेशमूर्तीची संकल्पना त्यादृष्टीने वेगळी वाटचाल ठरत आहे. ‘दर्शनासाठी भव्यता आणि विसर्जनासाठी पर्यावरणपूरकता’ असा दुहेरी संदेश देणारा हा प्रयोग यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.

गणपतीची मूर्ती वर्षभर साठवून ठेवण्यापेक्षा उत्सवापुरती भव्य मूर्ती भाड्याने घेणे आणि त्यानंतर पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तीचे विसर्जन करणे, हा विचार भविष्यात इतर शहरांतील गणेशोत्सव मंडळांसाठीही नवा पर्याय ठरू शकतो. त्यामुळे ‘गणपती विकत घेण्याचा नव्हे, तर उत्सव अनुभवण्याचा!’ हा बेंगळूरचा यंदाचा प्रयोग गणेशोत्सवाच्या बदलत्या प्रवाहाची नवी दिशा दाखवणारा ठरत आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *