Tuesday , September 22 2026
Breaking News

खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा

Spread the love

पीएलडी बँकेच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर

खानापूर : खानापूर तालुक्यात यंदा कमी पाऊस झाल्याने शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून केंद्र व राज्य सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जे माफ करावीत, अशी मागणी करणारा ठराव खानापूर तालुका प्राथमिक सहकारी कृषी व ग्रामीण अभिवृद्धी बँक (पीएलडी बँक) यांच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
ही सभा बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी 21 सप्टेंबर रोजी पार पडली.

सभेच्या प्रारंभी चेअरमन मुरलीधर पाटील, माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील, व्हाईस चेअरमन लक्ष्मण कसरलेकर, शिवसेनेचे नेते के. पी. पाटील, करवेचे जिल्हाध्यक्ष दशरथ बनोसी, सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिरजे, विरूपाक्ष पाटील व विजय कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेची सुरुवात करण्यात आली.
यानंतर बँकेच्या वार्षिक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. वार्षिक आढावा पत्रिका व अहवालाचे वाचन सुदीप गौडा पाटील व नारायण पाटील यांनी केले. बँकेच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजाबाबत भागधारकांना माहिती देण्यात आली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना चेअरमनकडून उत्तरे…

सभेदरम्यान भागधारक शेतकरी आणि सभासदांनी बँकेच्या कामकाजासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना चेअरमन मुरलीधर पाटील यांनी समर्पक उत्तरे दिली. तसेच शेतकऱ्यांनी केलेल्या विविध सूचना विचारात घेऊन त्यांची योग्य ती अंमलबजावणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा ठराव….
खानापूर तालुक्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतीसमोरील अडचणी वाढल्या आहेत. पिकांचे नुकसान, उत्पादनातील घट आणि वाढता शेती खर्च यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडत आहे. या पार्श्वभूमीवर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देण्याची मागणी सभेत करण्यात आली. या मागणीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे…
सभेत माजी आमदार अरविंद पाटील, यशवंत गावडे, कलाप्पा घाडी, विजय कामत, यशवंत बिरजे, विश्वनाथ डिचोलकर, दशरथ बनोसी, संजय कुबल, करवे तालुका अध्यक्ष विठ्ठल हिन्डलगेकर, भैरू कुंभार, राजू कुलम, पुंडलिक पाटील व रणजीत पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली.

यावेळी बँकेचे संचालक कुतुबुद्दीन बिचन्नावर, अशोक पाटील, सुभाष गुरव, निळकंठ गुंजीकर, सुनील चोपडे, यमन्नाप्पा राठोड, श्रीकांत करजगी, शंकर सडेकर, सौ. लक्ष्मी पाटील यांच्यासह बँकेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि सुमारे 700 भागधारक शेतकरी उपस्थित होते.

सभेच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, भागधारक शेतकरी व सभासदांचे आभार संचालक नारायण पाटील यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

सीआरपीएफमध्ये ३८ वर्षे सेवा बजावलेल्या रामचंद्र पाटील यांचा जटगे येथे सत्कार

Spread the love  जटगे : येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सीआरपीएफमध्ये तब्बल ३८ वर्षे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *