Wednesday , September 23 2026
Breaking News

पोल्ट्री फार्मच्या एनओसीसाठी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले; खानापूर आरोग्य विभागावर लोकायुक्तांची कारवाई

Spread the love

खानापूर : पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली एनओसी देण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून खानापूर तालुका आरोग्याधिकारी डॉ. महेश किवडसण्णावर आणि आरोग्य विभागातील एसडीए बिराप्पा राजापुरी यांच्याविरोधात लोकायुक्त पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत 6,000 हजारांची लाच स्वीकारताना एसडीए बिराप्पा राजापुरी यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

खानापूर तालुक्यातील कामशिनकोप्प येथील माजी सैनिक उदय चवलगी यांनी पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज केला होता. या प्रकरणात आवश्यक असलेली एनओसी देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी तक्रार केली होती.

ही तक्रार भाजप अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष तसेच कदंब सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जॉर्डन गोन्साल्विस यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर गोन्साल्विस यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लोकायुक्त पथकाने सापळा रचून ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
लोकायुक्त डीएसपी बी. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करत एसडीए बिराप्पा राजापुरी यांना 6,000 हजारांची लाच स्वीकारताना पकडले. या कारवाईत पीआय गुरुराज यांच्यासह लोकायुक्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

दरम्यान, या प्रकरणात तालुका आरोग्याधिकारी डॉ. महेश किवडसण्णावर यांचीही चौकशी सुरू असून, संबंधित दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. पुढील कारवाईनंतर न्यायालयीन कोठडीबाबत निर्णय होणार आहे.

लोकायुक्तांच्या या कारवाईमुळे खानापूर तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली असून, आरोग्य विभागातही चर्चेला उधाण आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास लोकायुक्त पथकाकडून सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री रवळनाथ हायस्कूलचा हॉलीबॉल संघ प्रथम

Spread the love शिवठाण : श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था, येळूर संचलित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *