








चापगाव : मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी चापगांव येथील उच्च प्राथमिक शाळा येथे स्मरणिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करुन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ‘शतपर्व’ स्मरणिकेचे पुनर्प्रकाशन तथा लोकार्पण करण्यात आले. चापगांव येथील प्राथमिक शाळेने तब्बल शंभर वर्षांचा शैक्षणिक आणि सामाजिक वारसा जपत अनेक पिढ्यांना घडविण्याचे कार्य केले आहे. या प्रदीर्घ वाटचालीच्या स्मृतींना उजाळा देत शाळेचा शताब्दी महोत्सव फेब्रूवारी २०२६ या महिण्यात विविध उपक्रमांनी मोठ्या थाटात साजरा करण्यात आला होता.
या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या शंभर वर्षांच्या वाटचालीची आठवण करुन देणारी ‘शतपर्व’ ही विशेष स्मरणिका प्रकाशित करण्यात आली आहे. शाळेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना, माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, शाळेच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती, शाळेशी संबंधित आठवणी तसेच शाळेच्या आजवरच्या वाटचालीचा मागोवा घेणाऱ्या आठवणींचे जतन करण्याच्या दृष्टीने या स्मरणिकेला विशेष महत्त्व आहे.
‘शतपर्व’ हे नाव शाळेच्या शंभर वर्षांच्या प्रवासातील विविध पर्वांचे प्रतीक आहे. एका शतकात बदललेले शैक्षणिक प्रवाह, बदलत्या सामाजिक परिस्थितीत शाळेने निभावलेली भूमिका, शिक्षकांनी केलेले ज्ञानदान, माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत मिळविलेले यश आणि ग्रामस्थांनी शाळेच्या विकासासाठी दिलेले योगदान यांचा हा स्मृतिप्रवास आहे. त्यामुळे ‘शतपर्व’ ही केवळ शताब्दीची स्मरणिका नसून चापगांवच्या शैक्षणिक इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शाळेच्या शंभर वर्षांच्या वाटचालीच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी बोलताना उपस्थित मान्यवरांनी शतक महोत्सव समिती, एसडीएमसी, शिक्षकवर्ग, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी शताब्दी महोत्सवासाठी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक केले. शाळेच्या शंभर वर्षांच्या इतिहासाचे जतन करण्यासाठी ‘शतपर्व’सारखी स्मरणिका प्रकाशित करणे ही पुढील पिढ्यांसाठी महत्त्वाची ऐतिहासिक नोंद असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी निमंत्रित पाहुण्यांमध्ये श्री. संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष भाजप, श्री. ज्योतिबा प्रल्हाद रेमाणी, माजी जिल्हा पंचायत सदस्य, ॲड. अभिजीत सरदेसाई, खानापूर, श्री. किसनराव गोदी बेळगावकर, उद्योजक पुणे, श्री. सयाजी पाटील, माजी सभापती तालुका पंचायत खानापूर, श्री. मल्लाप्पा मारीहाळ, माजी उपसभापती तालुका पंचायत खानापूर, श्री. रमेश धबाले, माजी अध्यक्ष ग्राम पंचायत चापगांव, श्री. मुकुंद तुकाराम पाटील, उद्योजक शिओली, श्री. नारायण गोविंद देसाई, माजी ग्रा. पं. सदस्य, आदिंनी आपले विचार मांडले. नंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री. मष्णू मारुती चोपडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्री. विलास धबाले, अध्यक्ष शतक महोत्सव समिती, श्री. कल्लाप्पा पाटील, श्री. उदय पाटील, अध्यक्ष पी.के.पी.एस् चापगांव, श्री. मनोहर रामचंद्र पाटील, श्री. पांडुरंग यल्लाप्पा पाटील, श्री. सूर्याजी पाटील, श्री. मुकुंद पुंडलिक पाटील, श्री. संजय पाटील, श्री. नागराज येळ्ळूरकर, श्री. शिवाजी मादार तसेच अन्य आमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय शतक महोत्सव समिती व शाळा सुधारणा समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, शाळेचे माजी विद्यार्थी, मराठी व कन्नड माध्यमांच्या दोन्ही शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
माजी विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान
शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या जडणघडणीत आणि सामाजिक जीवनात योगदान देणाऱ्या व्यक्तिंचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. कॅप्टन चांगाप्पा पाटील, सुभेदार शाहू पाटील, सुभेदार नागेश बेळगावकर, शिक्षक गोविंद पाटील, महेश कवळेकर, यल्लाप्पा कुकडोळकर, विलास पाटील तसेच मराठी व कन्नड दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित मानसन्मान करून त्यांना ‘शतपर्व’ स्मरणिका प्रदान करण्यात आली. स्मरणिकेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व जाहिरातदार व देणगीदारांपर्यंतही स्मरणिकेच्या प्रती पोहोचविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सदर स्मरणिकेची संकल्पानुसार आकर्षक मांडणी, सजावट, अक्षर जुळनी, आदी बाबींसाठी विषेश प्रयत्न केलेले श्री. सुनील पाटील, मुळचे कामतगा सध्या रा. कोल्हापूर तसेच पत्रकार श्री. चेतन लक्केबैलकर, श्री. गोविंद पाटील यांचेही विषेश कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. मष्णू चोपडे म्हणाले की शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने माजी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्यातील भावनिक नाते पुन्हा दृढ झाले. शाळेने दिलेल्या संस्कारांची आणि शिक्षणाची आठवण अनेकांच्या मनात आजही कायम असून, शाळेच्या पुढील वाटचालीसाठीही सहकार्य करण्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक नृत्याच्या सादरीकरणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Belgaum Varta Belgaum Varta