Sunday , October 4 2026
Breaking News

६२ गावे “ईएसझेड” क्षेत्रातून वगळण्याची म. ए. समितीची मागणी; उद्या निवेदन देणार

Spread the love

 

खानापूर : पश्चिम घाट पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या “ईएसझेड” प्रस्तावित अधिसूचनेत खानापूर तालुक्यातील ८५२ चौरस किलोमीटर क्षेत्रातील ६२ कंदाय गावांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध करून ही गावे “ईएसझेड”च्या जाचक अटींतून पूर्णपणे वगळावीत, या मागणीसाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना आक्षेपाचे निवेदन देण्यात येणार आहे.

यासाठी सकाळी १० वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येणार आहेत.

“ईएसझेड”च्या अटींमुळे शेतकरी, कष्टकरी तसेच सीमावर्ती दुर्गम भागातील नागरिकांच्या जमिनीच्या हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता असून, रस्ते व इतर मूलभूत पायाभूत सुविधांच्या विकासावरही मर्यादा येण्याची भीती समितीने व्यक्त केली आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात तालुक्यातील जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे.

निवेदन देण्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, मध्यवर्ती व युवा समितीचे पदाधिकारी, गावागावातील प्रमुख कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजन सरदेसाई आणि सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

म. मं. ताराराणी महाविद्यालयाचा दसरा जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यात पहिला क्रमांक!

Spread the love  खानापूर : जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर खानापूर येथील म. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *