


खानापूर : जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर खानापूर येथील म. मं. ताराराणी पी.यू. कॉलेजच्या विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. बेळगाव, यळ्ळूर, कडोली, कंग्राळीसह बैलहोंगल, सौंदत्ती , रामदुर्ग अशा खेळाडूंचे निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या आणि प्रतिष्ठेचे मानलेल्या नुकत्याच पार पडलेल्या दसरा जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत म मं ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय मुलींच्या संघाने चमकदार कामगिरी करत थेट पहिला क्रमांक पटकावत जिल्ह्यात अव्वल असण्याची किमया केली! या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण तालुक्यात यडोगा गावचे व ताराराणी महाविद्यालयाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. कारण या संघात यडोगा गावच्या खेळाडू जास्त प्रमाणात आहेत त्या सर्व विद्यार्थिनी ताराराणी महाविद्यालयात शिकत असून क्रीडा शिक्षक श्री. प्रशांत पांखरे यांच्या मार्गदर्शनाखाली खो -खो चे धडे गिरवत आहेत.
या स्पर्धेच्या आतिमहत्वाच्या अंतिम सामन्यात ताराराणी कॉलेजच्या संघाने SSBG क्लब, परमानंदवाडी सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध तुफानी खेळी केला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मुलींनी ४-२ अशा दणदणीत फरकाने विजय मिळवत दसरा जिल्हास्तरीय विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. या विजयाचे संपूर्ण श्रेय संघाच्या शिस्तबद्ध खेळाला जाते, विशेषतः अंतिम सामन्यात गंगा कुकडोलकर आणि लक्ष्मी हंगिरकर यांनी दोन्ही डावांत केलेल्या अभेद्य आणि उत्कृष्ट संरक्षणाने (Defense) उपस्थितांची मने जिंकली व संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
केवळ खो-खोच नव्हे, तर विविध सांघिक खेळांमध्येही या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राज्य पातळीवर झेंडा रोवला आहे. नंदगड येथे झालेल्या जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत गायत्री गुरव व प्रणाली चुडयेकर यांची, रामदुर्ग येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पल्लवी पाटील, दिव्या शिरोडकर व रेणुका गुरव यांची, तर चंदरगी येथे झालेल्या खो-खो स्पर्धेत अपेक्षा निलजकर व लक्ष्मी हंगिरकर यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आता दसरा स्पर्धेतील या शानदार विजयामुळे ताराराणी कॉलेजच्या खो-खो संघाची विभागीय स्तरासाठी निवड झाली असून, ही स्पर्धा येत्या ३० सप्टेंबर रोजी बागलकोट येथे पार पडणार आहे.
विद्यार्थिनींच्या या देदिप्यमान यशाबद्दल मराठा मंडळ शिक्षण संस्थच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू (हलगेकर) मॅडम, संचालक श्री. शिवाजीराव पाटील व श्री. परशुराम अण्णा गुरव तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अरविंद लक्ष्मणराव पाटील तसेच शारीरिक शिक्षक श्री. प्रशांत पाखरे, मौजे यडोगा येथील पालकवर्ग व सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सर्व विजयी खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले आहे. खानापूर तालुक्याच्या केंद्रस्थानी असणारा हा ताराराणीचा संघ बागलकोट येथे पुढील आठवड्यात संपन्न होणाऱ्या विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांची जय्यत तयारी करीत आहे.
ताराराणीच्या या लेकींनी आपल्या जिद्दीच्या जोरावर मैदान गाजवले असून, बागलकोटच्या रणांगणातही हिच विजयाची परंपरा कायम राहील, असा विश्वास कॉलेज परिवार व्यक्त केला जात आहे!

Belgaum Varta Belgaum Varta