


कुर्लीत धनगरी ओवी गायन स्पर्धा
निपाणी (वार्ता) : सध्याच्या आधुनिक युगात पारंपरिक लोककला लुप्त होत आहेत. नव्या पिढीला मातीतील संस्कृती, ढोल-कैताळाच्या तालाची आणि राम कथासार चरित्रावर आधारित ओव्यांची ओळख करून देण्यासाठी व पारंपारिक लोककलांचे संवर्धन धनगरी ओवी गायन स्पर्धा उत्तम माध्यम असल्याचे मत मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्रा. संजय हेरवाडे यांनी व्यक्त केले. कुर्ली येथील एचजेसी चीफ फौंडेशन व रा मुंबईतील मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित कलामहोत्सव प्रसंगी आयोजित धनगरी ओवी गायन स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डी. एस. चौगुले होते.
मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा जोतिराम चौगुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले.ज्येष्ठ धनगरी ओविकार मायाप्पा दिवटे यांनी नवकलाकारांना धनगरी गायन चाल, सूर व वाद्याबाबत मार्गदर्शन केले. वासू दिवटे यांनी व्यासपीठ गीताचे सादरीकरण केले. स्पर्धेत ‘रामकथासार’ अध्याय २ ते १७ यातील विषयांच्या चिठ्ठ्या उचलून त्यावर आधारित ओव्यांचे गायन झाले. कलाकारांनी आपल्या दमदार सादरीकरणातून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
स्पर्धेतअहिल्यादेवी ओविकार मंडळ- पेठनाका, बिरदेव ओविकार मंडळ- रेंदाळ, मंगोबा ओविकार मंडळ- उचगाव, बिरदेव अमोघसिद्ध ओविकार मंडळ -कसबे डिग्रज, हालसिद्धनाथ ओविकार मंडळ -आप्पाचीवाडी, लक्ष्मीदेवी ओविकार मेंढका संघ- धरणगुत्ती, रेवणसिद्ध ओविकार मंडळ- वाशी यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले.
उत्कृष्टवाद्य संगीत-बिरदेव ओविकार मंडळ -रेंदाळ,उत्कृष्ट गण – मंगोबा ओविकार मंडळ -उचगाव, उत्कृष्ट छंदीक -लक्ष्मीदेवी ओविकार मेंढका संघ -धरणगुत्ती या संघांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.मान्यवरांच्या हस्ते विजयी संघाना बक्षीसे देण्यात आले. कार्यक्रमास सुरेश प्रताप, शामराव चौगुले, सदाशिव बोंगार्डे, अशोक तेली, मुरारी बोते, कृष्णात चौगुले, संतोष नेर्ले, युवराज चौगुले, सीताराम चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आराध्या चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश बोंगार्डे यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta