


प्रजासेवा आंदोलनात विविध मागण्यांवर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची सकारात्मक भूमिका
खानापूर : बेळगाव जिल्हा प्रशासन व जिल्हा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रजासेवा आंदोलनात तालुक्यातील विविध प्रश्नांवर गर्लगुंजी ग्रा. पंचायत माजी सदस्य प्रसाद पाटील यांनी चर्चा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी, विधान परिषद सदस्य तसेच खानापूर तालुक्याचे आमदार उपस्थित होते.
खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या चार दिवसांत खानापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात येईल आणि त्यानंतर नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले.
विधवा, दिव्यांग आणि वृद्धांना मिळणाऱ्या पेन्शन काही लाभार्थ्यांची बंद झाल्या आहेत. त्यांचे तातडीने सर्वेक्षण करून बंद झालेल्या पेन्शन पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना बंद झालेल्या पेन्शन त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, गर्लगुंजी व परिसरातील सुमारे २२ गावांतील नागरिकांना महसूलविषयक छोट्या-मोठ्या कामांसाठी सुमारे २५ किलोमीटर अंतर कापून जांबोटी येथे जावे लागत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. नागरिकांच्या सोयीसाठी गर्लगुंजी येथे नेमदी केंद्र, सर्कल कार्यालय आणि डेप्युटी तहसीलदार कार्यालय सुरू करावे किंवा सध्या खानापूर येथे नेमदी केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
या मागणीवर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित भागाचा सर्वे करून नागरिकांच्या सोयीसाठी नेमदी केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे आदेश त्यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत संपूर्ण माहिती घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
प्रजासेवा आंदोलनामुळे खानापूर तालुक्यातील दुष्काळ, पेन्शन तसेच महसूल कार्यालयाशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta