


अधिसूचनेसाठी निवडणूक आयोगाच्या परवानगीची प्रतीक्षा; ग्रामपंचायतींची आरक्षण प्रक्रिया पूर्ण
बिदर : राज्यातील ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका घेण्यासाठी कर्नाटक सरकारने आवश्यक तयारी पूर्ण केली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षणाचा मसुदा तयार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज्य मंत्री ईश्वर बी. खंड्रे यांनी दिली.
बिदर येथे पत्रकारांशी बोलताना खंड्रे म्हणाले की, ग्रामपंचायतींची आरक्षण प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायतांच्या आरक्षणाची प्रक्रियाही पूर्ण झाली असून, मसुदा अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी सरकार सज्ज आहे.
मात्र पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने मसुदा अधिसूचना काढण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मागण्यात आली आहे. परवानगी मिळताच तत्काळ मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल, असे खंड्रे यांनी स्पष्ट केले.
मसुदा अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नियमानुसार नागरिकांना आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत दिली जाईल. त्यानंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येईल. पुढे राज्य निवडणूक आयोगाकडे निवडणुकीसंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

Belgaum Varta Belgaum Varta