


निपाणी (वार्ता) : शिक्षण, समाजसेवा आणि पत्रकारिता क्षेत्रातील कामाची दखल घेत प्रा. विठ्ठल नाईक यांना आशिया आंतरराष्ट्रीय संस्कृती संशोधन विद्यापीठकडून मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. मानद डॉक्टरेट पदवी देणारे विद्यापीठ केंद्र शासनाच्या नीती आयोगाद्वारे नोंदणीकृत आहे.
यापूर्वी प्रा. विठ्ठल नाईक यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार, राष्ट्रीय आदर्श उपसंपादक गौरव पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आशिया आंतरराष्ट्रीय संस्कृती संशोधन विद्यापीठकडून पदवीदान समारंभ तामिळनाडू येथे पार पडला. पण तब्येत अस्वस्थ्यामुळे या समारंभ उपस्थित राहता न आल्याने प्रा. नाईक यांना विद्यापीठाचे संचालक व संबंधितांनी घरी भेट देऊन मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली.
प्रा. विठ्ठल नाईक यांनी सीएलई डीएड महाविद्यालयात उपप्राचार्य आणि उत्तूर येथील डॉ. जे. पी. नाईक महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काही वर्षे सेवा बजावली आहे. शिवाय २३ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून शिक्षण आणि सामाजिक विषयांवर दर्जेदार लेखन केले आहे. वृद्धाश्रम, अनाथाश्रम यांना मदत व सामाजिक विकासातही त्यांचा पुढाकार असतो. त्यांच्या शिक्षण, समाजसेवा आणि पत्रकारिता क्षेत्रातील कामाची दखल घेत आशिया आंतरराष्ट्रीय संस्कृती संशोधन विद्यापीठकडून ही मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.
मुळगाव भीमापूरवाडी (ता. निपाणी) येथील आणि सध्या चिकोडी येथे वास्तव्यास असलेल्या प्रा. नाईक यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. मानद डॉक्टरेट पदवीमुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta