Tuesday , October 6 2026
Breaking News

पकडलेला साप जंगलात सोडण्यासाठी गेलेल्या सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू

Spread the love

 

खानापूर : पकडलेल्या सापाला जंगलात सोडण्यासाठी गेलेल्या सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथे मंगळवारी घडली. बडकू उर्फ सातेरी विठ्ठल सुतार (39) असे मृत सर्पमित्राचे नाव आहे.
विठ्ठल सुतार हे गेल्या दहा वर्षांपासून साप पकडण्याचे काम करीत होते. नागरिकांच्या घरात किंवा परिसरात साप आढळल्यास ते सुरक्षितपणे साप पकडून त्याला जंगलात सोडत असत.
मंगळवारी एका ठिकाणी साप पकडल्यानंतर सुतार तो साप जंगलात सोडण्यासाठी गेले होते. जंगलात पोते उघडून सापाला सोडत असताना सापाने अचानक पलटी मारून त्यांच्या हाताला दंश केला. त्यानंतर ते बेशुद्ध होऊन कोसळले.
साप सोडण्यासाठी जाताना ते सहसा कोणाला तरी सोबत घेऊन जात असत. मात्र, यावेळी ते एकटेच गेले होते. बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांनी शोध घेतला. यावेळी ते जंगलात बेशुद्ध अवस्थेत आढळले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर आण्णाबाळ दिगंबरराव पाटील यांच्या पुढाकाराने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. सुतार यांना उपचारासाठी बेळगाव येथे नेण्यात आले; मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
सुतार यांच्या पश्चात पत्नी आणि पाच वर्षांची मुलगी आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून इदलहोंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची नोंद खानापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. श्रीराम सेना इदलहोंड शाखेने सुतार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

About Belgaum Varta

Check Also

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री रवळनाथ हायस्कूलचा दिमाखदार उपविजय

Spread the love  शिवठाणच्या पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड खानापूर : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *