Friday , November 6 2026
Breaking News

जय गणेश युवक मंडळाच्या हाफपीच क्रिकेट स्पर्धेत श्री गणेश स्पोर्ट्स क्लब जुने बेळगाव प्रथम

Spread the love

 

स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब वडगावला द्वितीय क्रमांक; आदित्य वारंग उत्कृष्ट फलंदाज, तर मनीष मालिकावीर

गर्लगुंजी : दसरा आणि दिवाळी सणानिमित्त जय गणेश युवक मंडळाच्या वतीने गर्लगुंजी येथे आयोजित हाफपीच क्रिकेट स्पर्धेत श्री गणेश स्पोर्ट्स क्लब, जुने बेळगाव संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब, वडगाव संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. बेळगाव जिल्ह्यातील एकूण ३० संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सलग चार रात्री रंगलेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

स्पर्धेतील अंतिम सामने अत्यंत चुरशीचे झाले. श्री गणेश स्पोर्ट्स क्लब, जुने बेळगाव संघाने ओमकारच्या अचूक आणि चतुराईपूर्ण गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. प्रथम क्रमांकासाठी १५ हजार ५५५ रुपये आणि आकर्षक ट्रॉफी, तर द्वितीय क्रमांकासाठी ११ हजार १११ रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली.

वैयक्तिक पारितोषिकांमध्ये आदित्य वारंग याने उत्कृष्ट फलंदाजाचा मान मिळविला, तर मालिकावीराचा पुरस्कार मनीष याला प्रदान करण्यात आला.

मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण

बक्षीस वितरण समारंभाला गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील, शिक्षक सत्तापा पाटील, उद्योजक दिगंबर भातकांडे, मंडळाचे अध्यक्ष सतीश पाटील, सूरज पाटील, जोतिबा सुतार, संदीप पाटील, सूरज यलारिचे आणि दत्ता पाटील उपस्थित होते.

यावेळी समालोचक राहुल पालकर, पंच दत्ता देसाई, विक्रम पाटील, भुजंग मेलगे, निखिल शिंदे, ज्ञानेश्वर सिद्धानी, निखिल पाटील, भुजंग लोहार, अनंत पाटील यांच्यासह क्रिकेटप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खेळाबरोबर अभ्यासालाही महत्त्व द्या!

बक्षीस वितरणावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळाबरोबरच अभ्यासाकडेही तितकेच लक्ष देण्याचे आवाहन केले. सध्या गावोगावी विविध क्रीडा स्पर्धा आणि शर्यतींचे आयोजन होत असून, मैदानी खेळ शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे आणि पारंपरिक खेळांचे जतन करावे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

मात्र, गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या काळात गावोगावी होणाऱ्या विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेळ आणि शिक्षण यांचा योग्य समतोल राखणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांनी क्रीडाक्षेत्रात प्रगती करतानाच शैक्षणिक यशालाही तितकेच महत्त्व द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

या स्पर्धेमुळे परिसरातील क्रिकेटप्रेमींना उत्कृष्ट सामने पाहण्याची संधी मिळाली. जय गणेश युवक मंडळाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्था जिल्ह्यात अव्वल

Spread the love  रेशन दुकानदारांच्या मासिक बैठकीत सुर्यकांत कुलकर्णी यांचे गौरवोद्गार; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *