



जांबोटी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जांबोटी विभागात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून कर्नाटक राज्योत्सवाचा निषेध करावा, तसेच आपले उद्योगधंदे बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन समितीने केले.
भाषावार प्रांतरचनेच्या वेळी बेळगाव, निपाणी, कारवार आणि खानापूरसह मराठी भाषिकबहुल प्रदेश कर्नाटकात समाविष्ट करण्यात आल्याने सुमारे ४० लाख मराठी भाषिकांवर अन्याय झाल्याची भूमिका समितीने मांडली. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला असून, मराठी भाषिकांनी एकजूट कायम ठेवून लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले.
या मोहिमेत समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील सरचिटणीस आबासाहेब दळवी, उपखजिनदार पांडुरंग सावंत यांच्यासह गोपाळ पाटील, बाळासाहेब शेलार, प्रकाश चव्हाण समिती जेष्ठ नेते मारुतीराव परमेकर, रवींद्र शिंदे आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Belgaum Varta Belgaum Varta