






खानापूर : खानापूरच्या शिक्षण वलयात सध्या एका शिपायाची आणि त्यांच्या प्रेरणादायी यशाची जोरदार चर्चा सुरू आहे. मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर हे महाविद्यालय केवळ शैक्षणिक गुणवत्ताच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही आपले एक वेगळे स्थान निर्माण करून स्थिरावले. येथील खेळाडू विद्यार्थिनी विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करत असतानाच, आता येथील शिपायानेही आपल्या कर्तृत्वाचा आणि तंदुरुस्तीचा अनोखा ठसा उमटवला आहे.
मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षण संस्थेत नेहमीच विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला गेला आहे . “केवळ विद्यार्थीच नव्हे, तर आपल्या संस्थेतील प्रत्येक कर्मचारी वर्गानेही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी राहिले पाहिजे,” हा डॉ. राजश्रीताईंचा मोलाचा संदेश असतो. त्यांच्या या विचारातून प्रेरणा घेऊन आजवर अनेक कर्मचारी खेळाकडे वळले आहेत . याचेच सर्वात मोठे आणि अभिमानास्पद फलित म्हणजे म मं ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयातील शिपाई श्री. सातेरी यल्लाप्पा पाटील यांनी मिळवलेले हे बैलगाडा शर्यतीतील ऐतिहासिक यश.
दिवाळीच्या सणात रोमहर्षक थरार वाढविण्यासाठी एका अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा माणसाने बैलगाडा ओढण्याच्या शर्यतीचे मौजे बेकवाड तालुका खानापूर येथे आयोजन करण्यात आले होते. या अटीतटीच्या आणि ताकदीच्या खेळात खानापूर तालुक्यातील नामांकित आणि कसलेले स्पर्धक उतरले होते. आकर्षक चषक आणि रोख रकमेचे घसघशीत इनाम असलेल्या या स्पर्धेत सहभाग घेणे आणि त्यात टिकून राहणे ही सोपी गोष्ट नव्हती. मात्र, श्री. सातेरी पाटील यांनी महाविद्यालयातील खेळाडू विद्यार्थिंनीना आदर्श मानून आपल्या विलक्षण आत्मविश्वासाच्या आणि शारीरिक ताकदीच्या बळावर या स्पर्धेत सहभागी झाले
या थरारक स्पर्धेत सातेरी पाटील यांनी जिद्दीने मैदानात उतरत आपल्या ताकदीची चुणूक दाखवली. अवघ्या एका मिनिटाच्या वेळेत तब्बल 805 फूट 6 इंच अंतर पार करत त्यांनी तब्बल वीस नामांकित स्पर्धकांना मागे सोडले आणि स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. त्यांच्या या कामगिरीने उपस्थितांचे डोळे दिपले आणि संपूर्ण मैदानात त्यांच्या नावाचा जयघोष झाला.
आपल्या रोजच्या महाविद्यालयीन कामात प्रामाणिक असणारे आणि शिपाई पदाची जबाबदारी चोख पार पाडणारे श्री. सातेरी पाटील यांनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेले हे यश खरोखरच प्रत्येकासाठी थक्क करणारे आहे. वय किंवा हुद्दा कोणताही असो, जर मनगटात ताकद, मनात जिद्द आणि आरोग्याची जोड असेल, तर माणूस कोणतीही खडतर मजल मारू शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या श्री. सातेरी यल्लाप्पा पाटील यांचे हे कार्य केवळ खानापूर तालुक्यापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी आणि युवा पिढीसाठी एक दीपस्तंभ ठरले आहे.
या यशाबद्दल मराठा मंडळाचे संचालक श्री. शिवाजी पाटील, प्राचार्य अरविंद पाटील यांनी मुख्याध्यापक श्री. राहुल जाधव व महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या व विद्यार्थिनींच्या उपस्थितीत सत्कार केला.
Belgaum Varta Belgaum Varta