






विकासाचा वारसा, माणुसकीची नाळ आणि भाषिक आपुलकी जपणाऱ्या डॉ. अंजली निंबाळकर यांच्या आठवणी आजही गावागावांत
खानापूर : काळ पुढे सरकतो, दिवस बदलतात, परिस्थिती बदलते; मात्र काही माणसांनी समाजमनावर उमटवलेला ठसा कधीही पुसला जात नाही. तीन-चार वर्षांचा कालावधी उलटून गेला, तरी खानापूरच्या मातीमध्ये आणि जनतेच्या मनामध्ये डॉ. अंजली निंबाळकर (ताई) यांनी निर्माण केलेल्या विकासाच्या आणि आपुलकीच्या पाऊलखुणा आजही तितक्याच जिवंत आहेत. त्यांच्या कार्याच्या आठवणी आजही गावागावांत, घराघरांत आणि सर्वसामान्यांच्या चर्चेतून व्यक्त होताना दिसतात.
आज शाळकरी मुला-मुलींच्या पाठीवर दिसणाऱ्या डॉ. अंजली ताई फाऊंडेशन, खानापूर या नावाच्या शालेय बॅगा अनेकांच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण करतात. ज्ञानमंदिराकडे जाणाऱ्या चिमुकल्यांच्या पाठीवरील बॅगेवर झळकणारा ताईंचा हसरा चेहरा केवळ एक छायाचित्र नसून शिक्षण, प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीची आठवण करून देणारे प्रतीक ठरतो. या बॅगा पाहताना ताईंनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेल्या प्रयत्नांची जाणीव प्रकर्षाने होते.
डॉ. अंजली निंबाळकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध भाषांवरील त्यांचे प्रभुत्व आणि भाषिक आपुलकी. इंग्रजी, मराठी, कन्नड, हिंदी आणि कोकणी अशा विविध भाषांमध्ये त्या सहजपणे संवाद साधतात. प्रत्येक भाषेचा सन्मान राखत त्या संबंधित समाजाशी आपुलकीचे नाते जोडतात. त्यांच्या संवादातील स्पष्टता, विषयांचा अभ्यास आणि मांडणीतील निर्भीडपणा यामुळे त्यांचे नेतृत्व वेगळेपणाने उठून दिसते.
बेधडकपणे भूमिका मांडणे, विषयाचा सखोल अभ्यास करून आपले म्हणणे पटवून देणे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाकडे ठामपणे पाठपुरावा करणे, ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये राहिली आहेत. शासकीय यंत्रणेचा योग्य वापर करून जनतेची कामे मार्गी लावण्याचे कौशल्य त्यांनी आपल्या कार्यकाळात दाखवून दिले. विकासकामांसोबतच शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांनाही त्यांनी महत्त्व दिले.
त्यामुळेच आज खानापूरमधील शाळा, क्रीडांगणे आणि विविध शासकीय वास्तूंचा उल्लेख झाला की त्यांच्या कार्यकाळातील अनेक आठवणी जाग्या होतात. त्यांनी सुरू केलेल्या किंवा पाठपुरावा केलेल्या उपक्रमांची चर्चा आजही नागरिकांमध्ये होताना दिसते. त्यांच्या नेतृत्वाखालील कामकाजाचा अनुभव घेतलेल्या अनेकांना त्या दिवसांची आठवण आजही आहे.
राजकारणात पदे आणि जबाबदाऱ्या बदलत असतात; मात्र माणसांशी निर्माण झालेले जिव्हाळ्याचे नाते सहज संपत नाही. एखादी लेक काही काळ माहेरापासून दूर राहिल्यानंतर तिच्या परतण्याची जशी कुटुंबीयांना ओढ लागते, तशीच भावना आज खानापूरच्या काही नागरिकांच्या मनात व्यक्त होताना दिसते. विकासाच्या अपेक्षा, जुन्या आठवणी आणि नेतृत्वाविषयीची आपुलकी या भावनांमधून ताईंच्या पुनरागमनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ताईंच्या कार्याच्या आठवणी आजही खानापूरच्या मातीत रुजलेल्या आहेत. शाळकरी मुलांच्या पाठीवरील बॅगांपासून ते गावागावांतील चर्चांपर्यंत त्यांच्या कार्याचा संदर्भ आढळतो.
खानापूरची माती, इथली माणसे आणि इथल्या लेकरांशी जोडलेले हे नाते असेच अतूट राहावे, हीच अनेकांची भावना आहे. कारण काही पाऊलखुणा काळाच्या ओघात पुसल्या जात नाहीत; त्या पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा मार्ग बनतात.
ताई, खानापूरच्या मातीतील तुमच्या पाऊलखुणा आजही जिवंत आहेत… आणि ही माती, ही माणसे तुमच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत!
– सौ. छाया पाटील, खानापूर
Belgaum Varta Belgaum Varta