खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी येथील विजयनगर, गवळीवाडा रस्त्याची ऐन पावसाळ्याच्या सुरूवातीला दुरावस्था झाली आहे.
याभागातील धनगर, गवळी समाजाच्या प्राथमिक गरजांचा लोकप्रतिनिधींच्या लक्षात कधी येणार त्यामुळे येथील गवळी समाज अद्याप पुढे आला नाही.
या भागातील गवळी समाजाला मुख्यत्वे करून रस्त्याची नितांत गरज आहे. मात्र गेली कित्येक वर्षे हा गवळी समाज रस्त्यावीनाच दिवस काढत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात गवळीवाड्यात ये-जा करणे मुष्किल होत आहे.
याकडे तालुका लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
विजयनगर, गवळीवाड्यात रस्ता आणि गटारी नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
अशा चिखलातून ये-जा करताना महिलावर्गाना तसेच मुलाना त्रास सहन करावा लागतो.
तेव्हा तालुक्याच्या आमदारांनी विजयनगर, गवळीवाड्यातील रस्त्याची दुरावस्था पाहुन गैरसोय, दुर करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
यावेळी आमआदमी खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी जांबोटी येथील विजयनगर गवळीवाड्याला भेट देऊन पाहणी केली. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकारीवर्गाने गवळीवाड्याच्या रस्त्याची पाहाणी करून नागरिकांची गैर सोय दुर करावी, अशी मागणी केली आहे.
