खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बैलूर गावात जांबोटी (ता. खानापूर) येथील जांबोटी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या बैलूर शाखेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन व वास्तूशांती कार्यक्रम साधेपणाने पार पडला.
यावेळी सोसायटीच्या भव्य इमारतीचे उद्घाटन बैलूर येथील ज्येष्ठ सभासद मंगेश रामू गुरव, कृष्णा कल्लापा गुरव, रामू रोंगाणा कनगुटकर, पावणू शेनोळकर व इतर अशा ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मीटिंग हाॅल, चेअरमन केबीन, कॅश काऊंटर आदीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे चेअरमन विलासराव बेळगावकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली. याप्रसंगी सोसायटीचे सर्व संचालकांनी भव्य इमारत बैलूर येथे सोसायटीच्यावतीने उभारण्यात आल्याने परिसरातील सभासदांनी समाधान व्यक्त केले. सर्वांना ही कल्पना मनापासून आवडली. यावेळी सोसायटीचे सभासद, सल्लागार, हितचिंतक गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी यांनी उपस्थितांचे आभार मानले.