मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार ठरवताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धक्कातंत्र अवलंबतील असे संकेत मिळतायत. यावेळी विद्यमान आमदार असलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना वगळत नव्या चेहर्यांना संधी दिली जाणार असल्याचं कळतं. शिवसेनेकडून यावेळी सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावं निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे.
सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात निवडणूक लढण्याचं टाळलं होतं. तर आमशा पाडवी हे नंदुरबारचे जिल्हाप्रमुख आहेत. एकीकडे ही नावं चर्चेत आहेत तर दुसरीकडे सुभाष देसाई यांना पुन्हा संधी मिळावी यासाठी लॉबिंग सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुभाष देसाई यांना वगळल्यास त्यांना जास्तीत जास्त सहा महिने मंत्रिपदावर राहता येईल. त्यामुळे उद्योगमंत्रीपद कुणाला मिळणार याचीही उत्सुकता असेल. शिवाय पुढच्या काही महिन्यांत मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेतही यामुळे मिळत आहेत.
विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकरांना पुन्हा संधी दिली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, संजय दौंड, शिवाजीराव गर्जे, अमरसिंह पंडित यांची नावं सध्या चर्चेत आहेत.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार भाजपचे चार आमदार आरामात निवडून येतात तर पाचव्या उमेदवारासाठी त्यांना अधिकचे प्रयत्न करावे लागतील. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे पाच आमदार आरामात निवडून येतात तर सहाव्या जागेसाठी त्यांना काही मतांची गरज पडणार आहे. त्यामुळे राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही रस्सीखेच होऊन शेवटी मतदानाची वेळ येणार का हे पाहावे लागेल. पण तूर्तास उमेदवारांच्या निवडीची मात्र कोरोनाच्या सावटातच जाहीर करण्याची वेळ आली आहे.
