मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपने धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मविआ सरकारच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी सोबत येत शक्तीप्रदर्शन केलं.
आघाडीची मदार असलेल्या एकूण 29 आमदारांपैकी 13 जणांनी या बैठकीला हजेरी लावली. यामध्ये सरकार स्थापनेवेळी भाजपच्या गोटात असलेल्या दोन आमदारांचा समावेश आहे. पण सात आमदारांनी बैठकीला दांडी मारून आघाडीचं टेन्शन वाढवलं आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना आघाडीकडे 169 आमदारांचं पाठबळ होतं. भाजपकडे 105 आणि अन्य नऊ आमदार होते. या नऊ जणांमध्ये गोंदियाचे विनोद अग्रवाल व मीरा-भाईंदर गीता जैन यांचाही समावेश होता. महाविकास आघाडी सत्तेत येताच गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर अग्रवाल यांची सध्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोघांनीही बैठकीला हजेरी लावली आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीला अपक्ष आणि अन्य पक्षाच्या 29 पैकी 13 आमदारांनी उपस्थिती लावली. त्यामध्ये त्यामध्ये जैन व अग्रवाल यांच्यासह संजय शिंदे, राजेंद्र यड्रावकर, किशोर जोरगेवर, देवेंद्र भुयार, मंजुळा गावित, श्यामसुंदर शिंदे, नरेंद्र भोंडेकर,आशिष जैस्वाल, चंद्रकांत पाटील, विनोद निकोले, विनोद अग्रवाल आणि शंकरराव गडाख यांचा समावेश आहे.
बच्चू कडूंची दांडी.. तर हितेंद्र ठाकूर यांची मतं गुलदस्त्यात!
सध्या शालेय शिक्षण राज्यमंत्री असलेले बच्चू कडू आणि त्यांच्या संघटनेचे आमदार राजकुमार पटोले यांनी बैठकीला दांडी मारली. त्याचप्रमाणे अबू आजमींसह समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनीही बैठकीकडे पाठ फिरवली. अबू आजमी यांनी सशर्त पाठिंबा जाहीर केल्याची चर्चा आहे. तसेच बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारही बैठकीत नाहीत.
हितेंद्र ठाकूर यांना शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत भेटायला गेले होते. यानंतर तत्काळ गिरीष महाजन यांनीही ठाकूर यांची भेट घेतली. मात्र, या सात आमदारांकडून अद्याप कुणालाही पाठिंबा जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.
