मुंबई : शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहेच, पण त्यांनी आत्मपरीक्षण केल्यास शिवसेना पुन्हा एकसंध झाल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं. केसरकरांच्या या वक्तव्याला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. आम्हाला नाही, तर शिंदे गटालाच आत्मपरीक्षणाची गरज असून, शिंदे गटातील अर्धे आमदार भाजपात जातील असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
संजय राऊत म्हणाले, आत्मपरीक्षण कोणी करायचं हे ज्याचं त्यानं ठरवावे. गद्दारांनी आम्हाला आत्मपरीक्षणाबद्दल सांगू नये. आम्हाला आत्मपरीक्षणाची अजिबात गरज नाही. खरं तर त्यांनाच आत्मपरीक्षणाची गरज आहे. अब्दुल सत्तारांनी देखील माझ्याच पक्षातील नेत्याचा माझ्याविरोधात कट आहे, असा आरोप केला आहे. त्यामुळे केसरकरांनी आणि त्यांच्या गटानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
शिंदे गटात सुरू असलेली धूसफूस समोर येत आहे. शिंदे गटात देखील अजून गट पडले आहेत. त्यामुळे हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. तसेच या गटातील आमदारांचे परतीचे मार्ग बंद झाले असून त्यांना भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, असे देखील संजय राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकीला अजुन दीड वर्ष बाकी आहेत. भाजपनं महाराष्ट्रात मिशन 45 साठी कंबर कसलीये. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज चंद्रपूर आणि औरंगाबादचा दौरा करणार आहेत, यावर देखील संजय राऊत यांनी टीका केला आहे. महाराष्ट्रात जर भाजपाचे 145 मिशन होत असेल तर शिंदे गट कुठे आहे. मग शिंदे गटातील लोक काय धुणी भांडी करायला ठेवणार का? असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला. भारतीय जनता पक्षाच्या पायरीवर देखील यांना कोणी उभे करणार नाही तात्पुरती तडजोड आहे, असे देखील संजय राऊत म्हणाले.