सिंधुदुर्ग : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीचे अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आधी पूजन करण्यात आले.. त्यानंतर शिवआरती झाली आणि नंतर महाराजांच्या दिमाखदार मूर्तीचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, बंदर विकास मंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसंच दिपक केसरकरांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
मूर्ती अनावरण प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे की राजकोट किल्ल्यावरची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्याच तेजाने आणि त्याच स्वाभिमानाने अणि भव्यतेने उभी झाली आहे. मागच्या काळात दुर्दैवी घटना घडली होती. त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेत आम्ही ही मूर्ती पुन्हा प्रस्थापित करु. आम्ही अक्षरशः विक्रमी वेळेत ही मूर्ती प्रस्थापित झाली आहे. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन करतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिल्पकार सुतार यांनी अतिशय उत्तम दर्जाची मूर्ती तयार केली आहे. त्यांच्यासह आयआयटीचे इंजिनिअर, जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे लोक होते. कोकणात वेगवेगळ्या प्रकारची वादळळे येतात. तौक्ते, फयान यांसारख्या वादळांचा विचार यात करण्यात आला आहे. कितीही सोसाट्याचा वारा आला तरीही मूर्तीला काहीही होणार नाही.