जयपूर : एका कारला समोरुन येणाऱ्या कंटेनरने धडक मारली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर सहाजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातात एका नवविवाहित दांपत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात जयपूर ग्रामीण भागातील जमवारागडजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १४८ वर ही दुर्घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्न समारंभानंतर वधू-वर त्यांच्या कुटुंबासह आणि नातेवाईकांसह मध्यप्रदेश येथून परतत होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १४८ (दौसा-मनोहरपूर महामार्ग) येथे त्यांची कार समोरुन येणाऱ्या कंटेनरला धडकली. कंटेनर इतक्या वेगाने कारवर आदळला, की कारचा चक्काचूर झाला. गाडीत अनेकजण अडकले. ते मदतीसाठी मोठ्याने ओरडू लागले. अपघाताची माहिती मिळताच रायसर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी बचावकार्याला सुरुवात झाली. कारमध्ये एकूण १४-१५ लोक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघात झाल्यानंतर महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.