सांगली : सासरच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून सांगलीमध्ये एका ७ महिन्याच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून पतीसह सासू-सासरे या तिघांना अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीत कुपवाडा येथील ७ महिन्यांच्या गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋतुजा सुकुमार राजगे (२७ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ६ जून रोजी ऋतुजाने तिच्या सासरच्या घरी गळफास घेऊन या आत्महत्या केली. सासरच्या मंडळींकडून ऋतुजाला धर्मांतर करण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले.
सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी ऋतुजाचा छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप ऋतुजाच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये ऋतुजाचा पती सुकुमार राजगे, सुरेश राजगे आणि अलका राजगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.