

जयपूर : जयपूरमधील सवाई मान सिंह रूग्णालयात मध्यरात्री भयानक आग लागली. या आगीमध्ये उपचार घेणाऱ्या सहा रूग्णांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मुख्यमंत्री भजनलाल यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करत मृताच्या कुटुंबियांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली. रविवारी रात्री उशिरा जयपूरमधील सर्वात मोठ्या एसएमएस रूग्णालयात आगीचा भडका उडाला अन् शहरात एकच खळबळ उडाली. ट्रॉमा सेंटर आणि आयसीयूमध्ये २४ रूग्णांवर उपचार सुरू होते, त्यावेळी आगीचा भडका उडाला. रूग्णांना तातडीने हलवण्यात आले, पण ११ जणांची प्रकृती बिघडली. त्यामधील सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आली.
रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ट्रॉमा सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कुलिंगचे काम सुरू आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्याचा तपास केला जात आहे. आयसीयू वॉर्डच्या स्टोअरमध्ये आगीचा भडका उडाला होता. पेपर, आयसीयूचे सामान अन् ब्लड सॅम्पलच्या ट्यूबमध्ये आग लागली होती. त्यामुळे आयसीयूमध्ये विषारी धूराने तयार झाला होता.
ट्रॉमा सेंटर आणि आयसीयूमध्ये एकूण २४ रूग्णांवर उपचार सुरू होते. यामधील अनेकांची प्रकृती अतिशय गंभीर होती. आग लागल्याचे समजताच रूग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आले. पण या कालावधीत ११ जणांची प्रकृती अधिकच बिघडली. यामधील सहा जणांचा जागेवरच गुदमरून मृत्यू झाला. आग इतकी भयानक होती की रूग्णालयातील तो वॉर्ड पूर्णपणे जळून खाक झाला.
मृताच्या कुटुंबियांना ५-५ लाखांची मदत
जयपूरमधील एसएमएस रूग्णालयातील आगीची घटना मिळताच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. भजनलाल यांनी घटनास्थळाची पाहणी केली, त्यावेळी मंत्री जवाहर बेधम त्यांच्यासोबत होते. मुख्यमंत्री भजनलाल यांनी या घटनेबाबत तीव्र शब्दात दुख व्यक्त केले. त्याशिवाय मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५-५ लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली. तर जखमींचा उपचार मोफत दिला जाईल, असेही सांगितले. एसएमएस रूग्णालयातील आगीच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta