Friday , August 28 2026
Breaking News

सुवेंदू अधिकारी असणार पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री

Spread the love

कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दोन वेळा निवडणुकीत पराभूत करणारे सुवेंदू अधिकारी हेच आता नवे मुख्यमंत्री होणार आहेत. पश्चिम बंगाल भाजपाने याची घोषणा शुक्रवारी केली. पश्चिम बंगालच्या सत्ता स्थापनेचा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोलकाता येथे आले होते. त्यांच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

कोलकाता येथील बिस्वा बांगला कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भाजपाच्या पश्चिम बंगाल कार्यकारिणी आणि नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य उपस्थित होते. या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

या बैठकीत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, निवडणुका संपल्या असून पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. आता सर्वांनी एकच नाव पुढे केले आहे. दुसरे नाव निवडण्यासाठी नेत्यांना वेळ देण्यात आली, मात्र दुसऱ्या कुणाचेही नाव पुढे आले नाही. यामुळे आता सुवेंदू अधिकारी हेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

५५ वर्षीय सुवेंदू अधिकारी यांनी २०२१ साली नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्यानंतर पाच वर्ष त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा तब्बल १५ हजार मतांनी दणदणीत पराभव केला.

सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवास
सुवेंदू अधिकारी यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेपासून राजकीय जीवनाचा प्रवास सुरू केला. सुवेंदू अधिकारी जेव्हा राजकारणात आले तेव्हा बंगालमध्ये डाव्यांची सत्ता होती. १९९५ साली सुवेंदू अधिकारी पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९८ साली जेव्हा ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा सुवेंदू अधिकारी या पक्षात आले. २००६ मध्ये ते कांथी दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले. एका वर्षानंतर, ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राम आणि सिंगूरमधील जमीन अधिग्रहण विरोधी आंदोलनादरम्यान त्यांना मुख्य संघटक बनवण्यात आले. अधिकारी यांनी ‘भूमी उच्छेद प्रतिरोध समिती’चे नेतृत्व करत नंदीग्राममधील आंदोलनाचे सारथ्य केले. या आंदोलनाने बंगालमधील डाव्या आघाडीची ३४ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आणि २०११ मध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री बनल्या.

About Belgaum Varta

Check Also

2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणार; लाल किल्ल्यावरून मोदींचा निर्धार

Spread the love नवी दिल्ली : देशभरात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *