Saturday , May 9 2026
Breaking News

थलपती विजय घेणार उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

Spread the love

 

 

अखेर सत्ता स्थापनेचा पेच सुटला आहे. थलपती विजय हे उद्या 11 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तामिळनाडूचे राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय थलपती यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे आता तामिळनाडूला उद्या नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. टीव्हीके तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करणार आहे. तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत यावेळी थलपती विजय यांच्या टीव्हीकेनं जोरदार मुसंडी मारल्याचं पहायला मिळालं. पक्षाला राज्यात सर्वाधिक 108 जागा मिळाल्या. मात्र सर्वाधिक जागा मिळून देखील आतापर्यंत थलपती विजय हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकले नाहीत, कारण त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 118 जागांची गरज आहे. मात्र टीव्हीकेला 108 च जागा मिळाल्या होत्या. त्यांना बहुमतासाठी आणखी 10 आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता.

दरम्यान त्यानंतर थलपती विजय यांना काँग्रेसने पाठिंबा दिला, काँग्रेस आणि टीव्हीकेचे मिळून एकूण सदस्या संख्या 112 झाली मात्र तरी देखील टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी आणखी 6 आमदारांची गरज होती. अखेर सीपीएम आणि सीपीए या डाव्या पक्षांनी थलपती विजय यांना पाठिंबा दिल्यानं टीव्हीकेकडे बहुमत झालं आहे. त्यानंतर आता राज्यपालांनी थलपती विजय यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे. थलपती विजय हे उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

त्यापूर्वी थलपती विजय यांनी राज्यपालांची दोनदा भेट घेतली होती, सत्तास्थापनेचा दावा केला होता, मात्र राज्यपालांनी त्यांना 118 आमदारांच्या पाठिंब्याची यादी सादर करण्यास सांगितलं होतं. शेवटी सीपीएम आणि सीपीए यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आता थलपती विजय यांच्या पक्षाला बहुमत प्राप्त झालं आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच सुटला आहे. थलपती विजय यांच्या पक्षाकडून एआयएडीएमकेकडे देखील पाठिंब्याची मागणी करण्यात आली होती. परंतु एआयएडीएमकेने थलपती विजय यांना पाठिंबा देण्यास नकार दिला. दरम्यान आता टीव्हीके हा सत्ताधारी पक्ष असणार आहे, तर दुसरीकडे डीएमके हा विरोधी पक्ष असणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके, डीएमके एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्या

Spread the love  नवी दिल्ली : विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर आता तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी आकड्यांची जुळवाजुळव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *