Sunday , July 26 2026
Breaking News

स्टील प्लांटमध्ये भीषण दुर्घटना; उकळते स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा मृत्यू, 6 जण गंभीर

Spread the love

 

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विझाग स्टील प्लांट येथे सोमवारी सायंकाळी भीषण औद्योगिक दुर्घटना घडली. स्टील मेल्टिंग शॉप (SMS-2) विभागात क्रेनद्वारे वाहतूक करण्यात येत असलेल्या उकळत्या स्टीलच्या लॅडलमध्ये (मोठ्या भांड्यात) अचानक बिघाड होऊन वितळलेले स्टील कामगारांवर कोसळल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 6 कामगार गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 1,600 अंश सेल्सिअस तापमानाचे वितळलेले स्टील क्रेनच्या सहाय्याने एका विभागातून दुसऱ्या विभागात नेले जात होते. यावेळी लॅडलचा स्फोट अथवा तांत्रिक बिघाड झाल्याने मोठ्या प्रमाणात उकळते स्टील खाली सांडले. त्याच्या तडाख्यात आलेले कामगार गंभीररीत्या होरपळले. अपघातानंतर संपूर्ण प्लांट परिसरात एकच गोंधळ उडाला आणि कर्मचारी जीव वाचवण्यासाठी धावाधाव करू लागले.

घटनेची माहिती मिळताच प्लांट प्रशासन, अग्निशमन दल आणि सुरक्षा पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले असून बचावकार्य युद्धपातळीवर राबविण्यात आले. दुर्घटनेनंतर आंध्र प्रदेश सरकारने घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांमधील त्रुटी अथवा यांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त केला जात असून नेमके कारण चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *