नवी दिल्ली : जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन झालं आहे. त्यांची मुलगी सुभाषिनी यादव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शरद यादव यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बिहारच्या राजकारणात वेगळी ओळख असलेले शरद यादव यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. समाजवादी राजकारणामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते. गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात त्यांचं निधन झाल्याची माहिती समजत आहे.
शरद यादव यांची कन्या सुभाषिनी यादव याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकद्वारे वडील शरद यादव यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ‘पापा नहीं रहे’ असं हिंदी भाषेतून लिहिलं आहे.
७० च्या दशकात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील चळवळीतून शरद यादव यांनी भारतीय राजकारणात पाऊल ठेवलं. त्यांनी जनता दलापासून फारकत घेत १९९७मध्ये जनता दल (युनायटेड) ची स्थापना केली. २०१७ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील गटाला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर शरद यादव यांनी जेडीयूवरील आपला दावा गमावला. पुढे नितीश कुमार यांनी शरद यादव यांच्यावर पक्षाविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे त्यांना राज्यसभेतून अपात्र ठरवण्यात आले. २०१८ मध्ये, जेडी (यू) पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी एलजेडीमध्ये प्रवेश केला होता.