शिवकाशीत भीषण दुर्घटना
तमिळनाडुतील विरुधुनगर जिल्ह्यात गुरुवारी एक फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात पाच महिलांसह आठ कामगारांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. ही घटना शिवकाशीजवळील सेंगामालापट्टी गावातील श्री सुदर्शन फायरवर्क्समध्ये घडला. सारवणन यांच्या मालकीच्या युनिटमध्ये 40 हून अधिक वर्किंग शेड आहेत. येथील वर्किंग शेडमध्ये कर्मचारी गुरुवारी दुपारी फॅन्सी फटाके तयार करत असताना घर्षण होऊन हा स्फोट झाला. स्फोटानंतर आग जवळपासच्या शेडमध्ये पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. जखमींना शिवकाशी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक बचावकार्य चालविण्याचे आणि जखमींना योग्य उपचार मिळतील याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
स्टॅलिन म्हणाले, आदर्श आचार संहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊन मृतांच्या कुटूंबीयांना सरकारी मदत प्रदान करण्यात येईल. शिवकाशी हे भारतातील फटाका उत्पादन केंद्र म्हणून ओळखले जाते. येथूनच फटाके, सेफ्टी मॅच आणि स्टेशनरी वस्तू तयार करून संपूर्ण देशभरात पाठवल्या जातात.