
डॉ. प्रभाकर कोरे : निपाणीत मोफत महाआरोग्य शिबिर
निपाणी(वार्ता): केएलई संस्थेने शिक्षणाबरोबरच आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वसामान्यांसाठी सर्व सोयीनियुक्त रुग्णालय उभारले आहे. त्यामध्ये दररोज हजारो रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या ४ हजार बेडचे रुग्णालय सुरू असून भविष्यात ७ हजार बेडचे रुग्णालय करण्यासाठी प्रयत्नशील आहे. लवकरच या ठिकाणी कॅन्सरच्या हॉस्पिटल उभारून रुग्णांना सेवा देण्यात येणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांनीही लाभ घ्यावा, असे आवाहन केएलई संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले.
डॉ.कोरे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गुरुवारी केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात मोफत महाआरोग्य शिबिराचे केएलईशी संलग्न संस्था, रोटरी क्लब, महादेव मंदिर सांस्कृतिक भवन, श्री.महात्मा बसवेश्वर सौहार्दच्या संयुक्त विद्यमाने शिबिरात बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्रविण बागेवाडी होते.
डॉ.कोरे म्हणाले, गुणात्मक शिक्षण आणि सर्वसामान्यांचे आरोग्य लक्षात घेऊन ही संस्था कार्यरत आहे. बेळगाव जिल्ह्यात विविध भागात हॉस्पिटल व शिक्षण संस्था सुरू आहेत. या ठिकाणी खराब झालेले हृदय, आणि लिव्हर बदलण्याचे कार्य होत असून लवकरच फुफ्फुस बदलण्याची शस्त्रक्रिया ही उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कोट्यावधी रुपयांची यंत्रणा कार्यान्वित केले जात आहे. शासकीय योजनांच्याद्वारे सर्वसामान्य कुटुंबांना मोफत शस्त्रक्रिया व इतर उपचार केले जात आहेत. आतापर्यंत दरवर्षी ९ हजार विद्यार्थ्यावर हृदय व इतर शस्त्रक्रिया केल्या आहेत. पाणी रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध रोगावर ७३ शिबीरे घेऊन १८ हजार रुग्णावर उपचार केले आहेत. शेतकऱ्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सुरू केले असून त्याद्वारे विविध पिकांची बियाणे तयार केले जात आहेत. याशिवाय शेतकऱ्यांसाठी लवकरच प्रात्यक्षिके शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. भाषा, जात, पात, पंथ याकडे लक्ष न देता संस्थेने सामाजिक कार्य सुरू केले आहे. त्याचा सर्वसामान्य कुटुंबाने लाभ घ्यावा.
प्रारंभी डॉ. कोरे यांच्यासह व्यासपीठावरील मानावरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन झाले. माजी उपराध्यक्ष सुनील पाटील यांनी स्वागत केले. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांनी मनोगतातून केएलई संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या दिनदर्शिकाचे अनावरण झाले. या शिबिराचा शहरासह ग्रामीण भागातील १० हजार पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला.
यावेळी डॉ. राजू कोठीवाले, लक्ष्मण चिंगळे, चंद्रकांत तारळे, अशोककुमार असोदे, डॉ.चंद्रकांत कुरबेट्टी, डॉ. एस. आर. पाटील, सुरेश शेट्टी, राजेश कदम, रमेश पै, राजकुमार सावंत, रोटरीचे अध्यक्ष दिलीप पठाडे, मेजर डॉ. दयानंद, निकु पाटील, समीर बागेवाडी, रवींद्र शेट्टी, पप्पू पाटील, गजेंद्र तारळे, संजय मोळवाडे, महेश बागेवाडी, नगरसेविका अनिता पठाडे, प्राचार्य एम. एम. हुरळी, वीरू तारळे, गजानन शिंदे, प्रताप मेत्रानी, मल्लिकार्जुन गडकरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.