रांगोळीतून साकारल्या 12 ज्योतिर्लिंगांच्या मुर्त्या : भाविकांची दर्शनासाठी गर्दी
निपाणी (वार्ता) : शहर परिसरात विविध ठिकाणी मंगळवारी (ता. 1) महाशिवरात्री उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाले. शहरातील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून मोठी गर्दी झाली होती. चांदीच्या पालखीत उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. शहरासह परिसरातील सर्वच शिवालये भाविकांनी फुलली होती. पहाटे येथील महादेव मंदिरातील शिवलिंगास श्रीमंत दादाराजे निपाणकर-सरकार दांपत्यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर चांदीच्या पालखीला देवस्थान कमिटी पदाधिकारी व भाविकांच्या हस्ते अभिषेक आणि रथाची पूजा झाली. पहाटे तीन तास पूजेचा कार्यक्रम झाला. त्यानंतर भाविकांना खिचडीचा प्रसाद वाटण्यात आला. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. दुपारी नैवेद्याचा कार्यक्रम झाला. सायंकाळी शिवकीर्तन त्यानंतर पालखी व ’श्री’ वाहन मिरवणुकीचे कार्यक्रम झाले.
महाशिवरात्रीनिमित्त मंदिराला विद्युत रोषणाई व फुलांच्या माळा सोडून सुशोभिकरण करण्यात आले होते. त्यामुळे मंदिर परिसर झळाळून गेला होता. बेलपत्रे, फुले वाहण्यासह दुग्धाभिषेक करून भाविकांनी दर्शन घेतले. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात आकर्षक सजावट केली होती.
दिवसभरात केएलई संस्थेचे संचालक अमर बागेवाडी, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, रवींद्र कोठीवाले, मल्लिकार्जुन गडकरी, व्हीएसएमचे संचालक संजय मोळवाडे, चंद्रकांत तारळे, सुरेश शेट्टी, माजी नगरसेवक रवींद्र चंद्रकुडे, महेश दुमाले, सदानंद चंद्रकुडे, बाबासाहेब चंद्रकुडे, अण्णासाहेब जाधव, डॉ. महेश ऐनापुरे, अनिल पाटील, नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्यासह नगरसेवक व भाविकांनी दर्शन घेतले.
येथील चिक्कोडी रोडवरील वीरुपाक्षलिंग समाधीमठात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दिवसभर येथील शिवलिंग व प्राणलिंग स्वामी यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. मंगळवार पेठेतील महादेव मंदिरात दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सोमनाथ मंदिर, प्रगतीनगरातील महादेव मंदिर व शिप्पूर येथील रामलिंग मंदिर, वाळकी महादेव मंदिरातही गर्दी होती.
—-
रांगोळीपासून 12 ज्योतिर्लिंगांच्या मुर्त्या
महाशिवरात्रीनिमित्त येथील महादेव गल्ली येथील महादेव मंदिरात येथील राजू नेर्ली व सहकार्यांनी तीन दिवस मेहनत घेऊन गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, तमिळनाडू येथील बारा ज्योतिर्लिंगांच्या मुर्त्या रांगोळीमधून तयार केल्या होत्या. त्यासाठी सुमारे 1500 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. या मुर्त्या यंदाच्या महाशिवरात्रीच्या आकर्षण ठरल्या.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2022/03/NIPPANI-660x330.jpg)