Friday , April 17 2026
Breaking News

कुन्नुरमधील पाणी योजना बंद करण्याचा घाट

Spread the love

 

प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध ग्रामस्थांचा यल्गार : योजना बंद केल्यास उपोषणाचा इशारा
निपाणी (वार्ता) : कुन्नुर (ता.निपाणी) येथील सध्या अस्तित्वात असलेल्या आणि गावाला पिण्याचा मुबलक पाणीपुरवठा करणारी योजना बंद करण्याचा घाट प्रशासकीय पातळीवर सुरू झाला आहे त्याला ग्रामस्थांनी विरोध केला असून
बहु ग्राम पाणीपुरवठा योजना कधी पूर्ण होणार? त्याचे पाणी ग्रामस्थांना कधी मिळणार? योजनेची अंमलबजावणी वेळेत पूर्ण होणार का? असे प्रश्न जितेंद्र चेंडके, वरून कुलकर्णी, विलास पाटील यांनी ग्रामस्थां तर्फे उपस्थित केला आहे.
सदर कामाचे कंत्राटदार, तालुका, जिल्हा पातळीचे अभियंते, तहसीलदारांनी ग्रामीण पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्त घेऊन कुन्नूर येथील जुनी पाणीपुरवठा व्यवस्था बंद पाडण्यासाठी जेसीबी मशीन व अन्य यंत्रणा आणली होती. त्याला ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतचे माजी सदस्य, महिलांनी विरोध करून बहु ग्राम पाणीपुरवठा योजना करण्यास आमचा विरोध नाही. पण जुनी पाणीपुरवठा व्यवस्था पाडून या ठिकाणी नवीन योजना राबवू नये अशी मागणी केली आहे. त्यासाठी उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
यासंदर्भात जानेवारीमध्ये झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीमध्ये तसा ठराव करण्यात आला आहे. कुन्नूर गावाला गायरान जमीन नाही. त्यामुळे भविष्यात गावासाठी शासकीय इमारत किंवा अन्य योजना राबवण्यासाठी सध्या पाणीपुरवठा होत असलेल्या जागेच्या बाजूची जमीन वापरात येऊ शकते. यासाठी या ठिकाणी बहुग्राम पाणीपुरवठा योजना या जागेवरती राबवू नये अशी मागणी करण्यात आली आहे.
सदरच्या योजनेसाठी जॅकवेल बांधण्यासाठी पाच गुंठे जागा शासनाने विकत घेतली आहे. मग पाणीपुरवठा योजनेसाठी ३३ गुंठे जागा शासन का विकत घेऊ शकत नाही? असा प्रश्न ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना विचारला.
२ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत बरखास्त झाल्यानंतर प्रशासक व अन्य अधिकाऱ्यांच्या दबावाने ही कामे गावाला वेठीस धरून का करण्यात येत आहेत. २० वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतून सध्या गावाला सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे ही योजना बंद करून त्या ठिकाणी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याचा नेमका उद्देश काय? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केला आहे. चर्चे दरम्यान कर्नाटकाचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आपण स्वतः पाणीपुरवठा योजना व जागे संदर्भात पालकमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले आहे.
यावेळी तालुका पंचायतचे कार्यकारी, प्रवीण कट्टी, तहसीलदार सुरेश मुंजे, कामाचे कंत्राटदार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, वरुण कुलकर्णी, संतोष कोळी, मानाजी चेंडके, धोंडीबा धनगर, पोपट जाधव, पिंटू कोळी, धनाजी चेंडके, अश्विन चेंडके, संजय जाधव, विजय हेगडे, रामा करडे यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सांगली जवळील मांगले संघ ‘अरिहंत’ चषकाचा मानकरी

Spread the love  कोल्हापूरचा संघ उपविजेता; नारायणवाडी, हिंडलगा विभागून तृतीय क्रमांक निपाणी (वार्ता) : बोरगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *