Sunday , July 26 2026
Breaking News

कचरा, अतिक्रमण, पाणीटंचाईमुळे निपाणीकर बेजार

Spread the love

 

बाजारपेठ भागात रस्त्यांवरच वाहनांचे पार्किंग; नागरिकांना चालणेही झाले कठीण

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका सभागृहाचा कालावधी संपल्याने शहराचा डोलारा प्रशासकीय यंत्रणेवर उभा आहे. शहरात सध्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मध्यवर्ती आणि बाजारपेठेच्या महत्वाच्या भागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून, अस्वच्छता, ड्रेनेजची दुरवस्था, अतिक्रमण, अपुरा पाणीपुरवठा आणि वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांसह व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.


मुख्यत्वे बाजारपेठेचा भाग असलेल्या ठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा होणारे अनधिकृत अतिक्रमण आणि बेशिस्तपणे लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही. तर वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. व्यावसायिक गाळ्यांसमोरच जुने साहित्य आणि भंगार टाकण्यात आल्याने परिसराचे विद्रुपीकरण होत आहे.
——————————————————————-
पाणीटंचाई अन् खराब रस्ते
स्वच्छतेसोबतच शहरातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. अनेक गल्ल्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, काही ठिकाणी हॉल्व सांडपाण्यात असल्याने दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक प्रभागासह शहरातील रस्त्यांची अवस्थाही दयनीय झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्डयांमुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत.
—————————————————————-
कचऱ्याच्या साम्राज्यामुळे आरोग्याचा प्रश्न
प्रभागातील अनेक रस्त्यांची गेल्या अनेक दिवसांपासून झाडलोट झालेली नाही. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. उघड्यावर पडलेल्या घाणीमुळे दुर्गंधी पसरली आहे. पावसाळा तोंडावर असतानाही येथील गटारी आणि ड्रेनेज लाइनची साफसफाई मंद गतीने सुरू आहे. सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
—————————————————————-
‘शहरातील अनेक प्रभागात ड्रेनेज आणि कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग पडले आहेत. अतिक्रमणामुळे साध्या रुग्णवाहिकेलाही आत येता येत नाही. नगरपालिकेने तातडीने लक्ष देऊन येथील प्रश्न सोडवावेत.’
– रामचंद्र निकम, सामाजिक कार्यकर्ते, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *