Tuesday , October 6 2026
Breaking News

मक्याच्या ओल्या वैरणीचा दर गगनाला

Spread the love

 

प्रतिएकरी ३० ते ४० हजार रुपये दरामुळे पशुपालक अडचणीत

निपाणी (वार्ता) : पाऊस नसल्याने चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून, वैरणीचे दर वाढले आहेत. परिणामी निपाणी परिसरातील पशुपालकांसमोर पशुधन जगविण्याचे संकट उभे राहिले आहे.मक्याच्या ओल्या वैरणीचा दर प्रतवारीनुसार एकरी ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ऑक्टोबरमध्येच चाऱ्याचे हे दर गगनाला भिडले असताना पुढील मार्च, एप्रिल, मे महिन्यांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती पशुपालकांना आहे. पाऊस कधी पडणार आणि तोपर्यंत पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढ न झालेल्या उसाचा काही शेतकरी चाऱ्यासाठी वापर करीत आहेत. शिवाय त्याचाही दर अडीच हजार रुपये प्रतिगुंठा झाला आहे. त्यात पेंड, बार्ली आणि अन्य पशुखाद्यांचे दरही वाढले आहेत. दुष्काळी परिस्थितीत चारा मिळणे अवघड झाले असून, उपलब्ध चाऱ्यासाठीही मोठी किंमत मोजावी लागत आहे.

ऑक्टोबरपासून पुढील वर्षी जूनपर्यंत चाऱ्याच्या दरांची स्थिती काय असेल, याची चिंता पशुपालकांना सतावत आहे. वाढत्या खर्चामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे.
दुष्काळाचे सावट आणि चाऱ्याच्या वाढत्या दरांमुळे अनेक पशुपालक पशुधन विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. त्यामुळे बाजारात पशुधनाची संख्या वाढली असून, किमतीत घसरण झाली आहे. लाख रुपयांपर्यंत किंमत असलेली चांगली संकरित गाय सध्या ६० ते ७० हजार रुपयांना विकावी लागत असल्याचे पशुपालक सांगत आहेत.
——————————————————————–
‘दुष्काळाचे सावट असताना वैरणीचे दर गगनाला भिडले आहेत. वैरण मिळणेही मुश्कील झाले आहे. चाऱ्याचे दर वाढले, मात्र बाजारात पशुधनाचे दर कमी झाले आहेत.
– सागर पाटील, युवा शेतकरी, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत अक्कोळची श्रावणी रांगोळे ठरली अव्वल

Spread the love  निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित अक्कोळ येथील श्री पार्श्वमती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *