संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ ची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीत विजयी उमदेवाराने पैशाची बेसुमार उधळपट्टी केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळातून केली जात आहे. निवडणूक निकालानंतर बऱ्याच जणांनी मोबाईल स्टेटसवर दोन हजारांच्या नोट बरोबर विजयी भव! असा मजकूर लिहून निवडणुकीत पैशाच विजयी झाल्याचे नमूद केलेले पहावयास मिळाले. आजही अनेक जणांच्या मोबाईल स्टेटसवर पैसा बोलता है! या गाण्याची धून आजही ऐकावयास मिळताहे. पैशाची चर्चा होण्यास तशा अनेक गोष्टी कारणीभूत ठरलेल्या दिसताहेत. एका मतांसाठी दोन हजारांची पत्री देण्याबरोबर कुकर वाटप केल्याचा आरोप काॅंग्रेसकडून केला जात आहे. संकेश्वर घटक काॅंग्रेस अध्यक्ष संतोष मुडशी यांनी निवडणुकीत पैसा जिंकला, माणुसकी हारली अशी कडवट प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक निकालानंतर कुकरची शिट्टी वाजल्याची जोरदार चर्चा होताना दिसली. नूतन नगरसेवक नंदू मुडशी निवडणूक निकालानंतर देखील चर्चेत दिसताहेत. त्यांनी जाहीर आभाराची मोठी जाहिरातबाजी चालविलेली दिसताहे. एक साधी प्रभागाची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निवडणूक महागात पडणार..
आगामी विधानसभेची निवडणूक सहा एक महिन्यात होणार असून भाजप-काॅंग्रेस उमेदवारांना निवडणूक चांगलीच महागात पडणार असल्याची चर्चा आतापासूनच होतांना दिसत आहे. प्रभाग १३ च्या निवडणुकीत गुलाबी नोट दिलात. मत हवे तर आंम्हालाही गुलाबी नोटच द्या, अशी मागणी मतदारांनी केली तर काय करावयाचे? हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच मंत्री उमेश कत्ती यांनी नगरसेवक नंदू मुडशी यांना प्रभाग १३ मधील मताधिक्य ३०२ पेक्षा कमी होता कामा नये असे सांगितले तर मुडशींची चांगलीच गोची होणार आहे. प्रभाग १३ च्या निवडणूक निकालानंतर देखील पैसा बोलता है!ची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. बसनगौडा पाटील यांनी वानर पैसा खात असल्याचे व्हिडिओ क्लीपने दाखवून पैशाची महिमा स्पष्ट केली आहे.
