संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १७ मधील मारुती गल्लीतील मातीचे ढिगारं हटविण्याचे काम पालिकेने गेल्या तीन महिन्यांपासून केलेले नसल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्यात आता झुडपे उगवलेली दिसताहेत. पालिकेचे एक काम बारा महिने थांब सारखा प्रकार चालल्याची तक्रार येथील लोकांनी केली आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना येथील नागरिक रवि कंबळकर म्हणाले, मारुती गल्लीत झुडपे उगवली राव.. नगरसेविका सौ. संगिता कोळी यांचं कोण ऐकतयं. आमच्या प्रभाग क्रमांक १७ मधील मारुती गल्ली ते माजी मंत्री दिवंगत मल्हारगौडा पाटील यांच्या निवासस्थानापर्यंतचा रस्ता पॅचवर्क करण्यात आला. रस्ता पॅचवर्क करताना रस्त्यातील माती कचऱ्याचे ढिगारे मारुती गल्लीत आणून टाकण्यात आले. येथील नागरिकांनी पालिकेच्या संबंधित अधिकारींना, नगरसेविका सौ. संगिता कोळी यांना सांगून देखील कोणीही त्याची दखल घ्यायला तयार नाही. परिणामी आता पालिकेने फेकून दिलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात झुडपे उगवलेली दिसत आहेत. त्यामुळे मारुती गल्लीतील नागरिकांनी आता पालिकेकडे मातीच्या ढिगारा सोबत झुडपे हटविण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
