बेंगळुरू : पहलगाम येथील हल्ल्यानंतर सुरू असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातून भारतीय सैनिकांप्रती एकता आणि समर्थन व्यक्त केले जात आहे. कर्नाटक काँग्रेसनेही ‘तिरंगा यात्रा’ काढून या भावनांना वाट मोकळी करून दिली.
आज सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली बेंगळूरमधील के.आर. सर्कल येथून या रॅलीला प्रारंभ झाला. ‘देशभक्ती दर्शवूया, एकता पसरवूया’ या जोशपूर्ण घोषवाक्यासह ही भव्य रॅली चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमजवळ असलेल्या मिन्सक स्क्वेअरपर्यंत काढण्यात आली.या ‘तिरंगा रॅली’मध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आमदार, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) पदाधिकारी आणि काँग्रेसच्या विविध आघाडीच्या संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच, शासकीय आणि खाजगी कार्यालयातील कर्मचारी, चित्रपटसृष्टीतील काही व्यक्ती आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने या रॅलीत सामील झाले.
रॅलीदरम्यान सहभागी झालेल्या हजारो नागरिकांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन ‘भारतमाता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन करत सर्वांनी आपल्या देशाप्रती असलेले प्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. दहशतवादाविरोधातील लढ्यात आपण आपल्या जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, हे या रॅलीच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले.