Wednesday , July 9 2025
Breaking News

कृष्णा खोऱ्यात पडलेल्या पावसामुळे आलमट्टी धरण वेळेपूर्वीच अर्धे भरले

Spread the love

 

विजयपूर (दीपक शिंत्रे) : शेजारच्या महाराष्ट्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उत्तर कर्नाटकची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीवरील आलमट्टी धरण वेळेपूर्वीच अर्धे भरले आहे. धरणात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून केपीसीएलमार्फत नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. पावसामुळे कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रासह कृष्णा खोऱ्यात पडलेल्या पावसामुळे आलमट्टी धरण निर्धारित वेळेपूर्वीच अर्धे भरले आहे. विजयपूर, बागलकोट, बेळगाव आणि महाराष्ट्रातील कृष्णा जलसंधारण क्षेत्रात १९ मेपासूनच धरणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. सुरुवातीला ४२४ क्युसेक्सने सुरू झालेला प्रवाह सध्या २३,२३० क्युसेक्सपर्यंत पोहोचला आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे २४ मेपर्यंत धरणात सरासरी प्रवाह होता. मात्र २५ ते २९ मेदरम्यान प्रवाह ३५ हजार ते ६० हजार क्युसेक्सपर्यंत पोहोचल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून २९ मे रोजी केपीसीएलमार्फत प्रथमच १० हजार क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यानंतर प्रवाहात थोडी घट झाल्यामुळे काही काळ पाणी सोडणे थांबवण्यात आले होते. पण सध्या ८,६६६ क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात येत आहे. पाणी सोडण्यापूर्वी पूर्वसूचना देण्यात आली आहे.

पुन्हा महाराष्ट्रातील कृष्णा जलसंधारण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणात पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी सकाळपासून पुन्हा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच धरण अर्धवट भरल्याची नोंद झाली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून चांगला पाऊस होत असून धरण अर्धवट भरल्यामुळे विजयपूर, बागलकोट, रायचूर, यादगिरी आणि कलबुर्गी जिल्ह्यांतील कृष्णा नदीच्या काठावरील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या मृगशीर्ष पावसामुळे चांगल्या खरिप हंगामाची आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. सध्या जमिनीत भरपूर ओलावा असून थोडा सुकल्यानंतर शेतकरी पेरणीस सुरुवात करतील. दुसरीकडे आधीच पेरलेली आणि ओलाव्याअभावी सुकलेली पिके पुन्हा तारलेली आहेत. महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणात प्रवाह वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे केपीसीएलमार्फत पाणी सोडले जात आहे. या भागातील शेतकरी सध्या आनंदात असून, पेरणीच्या तयारीत गुंतले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

दुसऱ्या टप्प्यात पहिल्या दिवशी बेळगाव, गुलबर्ग्याच्या आमदारांशी चर्चा; सुरजेवाला यांनी जाणून घेतल्या तक्रारी

Spread the love  जाहीर वक्तव्य न करण्याची ताकीद बंगळूर : राज्य सरकारवर नाराज असलेल्या कॉंग्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *