Monday , April 20 2026
Breaking News

बळ्ळारी दंगलीची सीआयडी चौकशी सुरू; चार गुन्हे सीआयडीकडे वर्ग

Spread the love

 

बंगळूर : बळ्ळारी येथे घडलेल्या दंगलीप्रकरणाची सीआयडी (गुन्हे अन्वेषण विभाग) चौकशी सुरू झाली आहे. या दंगलीशी संबंधित ब्रूस पेटे पोलिस ठाण्यात दाखल असलेले चारही गुन्हे सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहेत. दंगलीची सीबीआय चौकशी करावी, अशी भाजपची मागणी राज्य सरकारने फेटाळून लावत सीआयडी चौकशीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात झाली आहे.

वाल्मिकी जयंतीच्या बॅनर उभारणीच्या वादातून बळ्ळारीत उसळलेल्या दंगलीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा सर्वांगिण तपास सीआयडीकडून करण्यात येत आहे. दंगलीशी संबंधित आतापर्यंत दाखल झालेल्या सर्व एफआयआर तसेच प्राथमिक तपासाची कागदपत्रे सीआयडी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत.

ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सीआयडीचे पथक बळ्ळारीत दाखल झाले असून, दंगलीशी संबंधित संपूर्ण कागदपत्रांची छाननी करण्यात आली आहे. उद्यापासून दंगल घडलेल्या ठिकाणी पंचनामे (महाजर) करण्यात येणार आहेत. त्यानंतर जखमींचे जबाब नोंदवले जाणार असून, दंगलीच्या कारणांचा सखोल तपास केला जाणार आहे.

या प्रकरणात आमदार भरत रेड्डी आणि गंगावतीचे आमदार जनार्दन रेड्डी यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक नेत्यांचे जबाब, गोळीबाराशी संबंधित तपशील आदी पुरावे संकलित करून विस्तृत तपास केला जाणार आहे.

दरम्यान, कार्यकर्त्याच्या हत्येसाठी पेट्रोल बॉम्बचा वापर झाल्याचा आरोपही असून, त्याचीही चौकशी केली जाणार आहे. आतापर्यंत पोलिसांच्या शस्त्रांतून गोळीबार झालेला नसून, खासगी बंदुकीतून गोळीबार झाल्याची शक्यता असल्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी हितेंद्र यांनी स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर गंगावतीचे आमदार जनार्दन रेड्डी यांनी, राजशेखर यांच्या मृत्यूस आमदार नारा भरत रेड्डी आणि सतीश रेड्डी हेच थेट जबाबदार असून, दोघांनाही तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे.

पुरावा नष्ट केल्याचा आरोप
राजशेखर यांच्या मृत्यूनंतर दोन वेळा शवविच्छेदन झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर अंत्यसंस्कारासंदर्भात आणखी एक व्हिडीओ जाहीर करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रथम कब्र खोदून नंतर मृतदेह जाळण्यात आला. तसेच लाकडाऐवजी गॅसचा वापर करून अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

व्हिडीओ पुरावा जाहीर
स्मशानभूमीत कब्र खोदणाऱ्या ‘सोमा’ नावाच्या व्यक्तीचा जबाब व्हिडीओद्वारे जाहीर करण्यात आला असून, आमदार भरत रेड्डी यांच्या सूचनेनुसार मृतदेह जाळण्यात आल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे.

भाजपकडून आंदोलनाची घोषणा
बळ्ळारी दंगलीच्या निषेधार्थ भाजप १७ तारखेला बळ्ळारीत मोठे आंदोलन करणार आहे. तसेच बंगळुरपासून बळ्ळारीपर्यंत पदयात्रा काढण्याचाही विचार सुरू आहे. याबाबत माहिती देताना आमदार जनार्दन रेड्डी यांनी, येत्या दोन दिवसांत पक्षाध्यक्षांशी चर्चा करून आंदोलनाची रूपरेषा निश्चित केली जाईल, असे सांगितले.

फ्लेक्स व बॅनरवर बंदी
बॅनर उभारणीच्या वादातून झालेल्या दंगलीत एका काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर बळ्ळारी शहरात बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स व होर्डिंग्स उभारण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता बॅनर किंवा फ्लेक्स लावल्यास संबंधितांवर तसेच कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

योगेश गौडा खून प्रकरण: विनय कुलकर्णींसह १६ दोषीना आज शिक्षा होणार जाहीर

Spread the love  बंगळूर : २०१६ मध्ये घडलेल्या भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *