Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक सरकारची एक हजार दिवसपूर्ती; १३ फेब्रुवारीला हावेरीत भव्य रॅलीचे आयोजन

Spread the love

 

सलीम अहमद; लोकाभिमुख कामांचा लेखाजोखा मांडणार

बंगळुर : राज्य सरकारचे एक हजार दिवस पूर्ण होत असतानाच्या पार्श्वभूमीवर १३ फेब्रुवारी रोजी हावेरी येथे भव्य रॅली आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सरकारचे मुख्य प्रतोद सलीम अहमद यांनी दिली. आज हावेरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले की, अधिवेशनादरम्यान एक लाख लोकांना जमिनीचे मालकी हक्क प्रदान करण्यात येणार असून सरकार लोकाभिमुख कार्यक्रम राबविण्यास कटिबद्ध आहे. भाजपने गरिबांना एकही घर दिले नाही, असा आरोप करत त्यांनी सांगितले की, आमचे सरकार समाजातील सर्व घटकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. २२ ते ३१ जानेवारीदरम्यान होणाऱ्या अधिवेशनात जनतेच्या समस्या सोडविण्यावर भर दिला जाईल.
सभागृहातील चर्चांबाबत बोलताना सलीम अहमद म्हणाले, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी सकारात्मक चर्चेत सहभागी होऊन लोकहिताचे निर्णय घ्यावेत. सभागृहात राजकारण न करता जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी. केंद्रात राज्यातील पाच मंत्री असतानाही ते लोकांच्या समस्यांना उत्तर देत नाहीत. मुख्यमंत्री पंतप्रधान व केंद्रीय मंत्र्यांना भेटूनही प्रश्न मार्गी लागत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
सरकारच्या कामगिरीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, सरकारने दिलेल्या पाचही हमी पूर्ण केल्या असून ‘शक्ती’सारखा मोठा कार्यक्रम जगात कुठेही नाही. दोन वर्षे सात महिन्यांत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यात आली असून २०२८ मध्येही काँग्रेस सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटना बळकट केली जाईल, असेही ते म्हणाले.
निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हमी योजना हेच आमचे भांडवल असून राज्यातील तिन्ही पोटनिवडणुका काँग्रेसने जिंकल्या आहेत. मनरेगा योजनेचे नाव बदलल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
भाजपवर आरोप करताना सलीम अहमद म्हणाले की, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि महात्मा गांधी यांची नावे काढून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गांधीजींच्या तत्त्वांवर घाला घातला जात असून, राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष सुरू आहे. हा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी करत त्यांनी सांगितले की, केंद्राविरुद्ध सत्याग्रह व धरणे आंदोलन करण्यात येईल. देशातील जनता भाजपला माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

About Belgaum Varta

Check Also

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी

Spread the love  बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *