
बंगळूर : राज्याच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने दहावी (एसएसएलसी) परीक्षेत तृतीय भाषा, विशेषतः हिंदी विषयासाठी गुणांऐवजी ग्रेड देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची मसुदा अधिसूचना अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
या मसुद्यावर सर्वसामान्यांकडून आक्षेप व सूचना मागवण्यात आले असून, त्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, एसएसएलसी उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन सुरू झाले असून, निकाल २४ एप्रिल रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
ग्रेड पद्धती कशी असेल?
मसुदा अधिसूचनेनुसार, तृतीय भाषा आणि एनएसक्यूएफ (राष्ट्रीय कौशल्य पात्रता चौकट) विषयांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवर आधारित ए, बी आणि सी असे ग्रेड दिले जातील.
महत्त्वाचे म्हणजे, हे ग्रेड विद्यार्थी पास किंवा नापास असल्याचे दर्शवणार नाहीत. म्हणजेच, ए ग्रेड मिळालेला विद्यार्थीही नापास मानला जाणार नाही. हे फक्त कामगिरीची पातळी दर्शवणारे असेल.
एकूण गुणांमध्ये बदल
यापूर्वी शिक्षण मंत्री मधु बांगारप्पा यांनी जाहीर केल्याप्रमाणे, तृतीय भाषेला गुणांऐवजी ग्रेड दिल्यामुळे एकूण गुणांची गणना ६२५ वरून ५२५ करण्यात येणार आहे. म्हणजेच, हिंदी विषयाचे १०० गुण एकूण मेरिटमधून वगळले जातील.
हायकोर्टाचा निर्णय
या निर्णयाविरोधात एच. एन. चंदना आणि एस. वेंकटेश यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. परीक्षेच्या अंतिम टप्प्यात घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्यास बाधक ठरेल, असा त्यांचा दावा होता.
मात्र, अर्जदारांनी सरकारी आदेशाची अधिकृत प्रत सादर न करता केवळ वृत्तपत्रांच्या आधारे याचिका दाखल केल्याने न्यायालयाने ती फेटाळून लावली. तसेच अर्जदारांवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, तो राज्य विधी सेवा प्राधिकरणाला जमा करण्याचे निर्देश देण्यात आले.
सार्वजनिक सूचना आमंत्रित
या मसुदा अधिसूचनेबाबत कोणाकडे आक्षेप किंवा सूचना असल्यास, त्यांनी सात दिवसांच्या आत शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे सादर कराव्यात. सार्वजनिक प्रतिसादानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
समर्थन आणि विरोध
या निर्णयाचे समर्थक म्हणतात की, हिंदी तृतीय भाषा असल्याने तिच्यावर अधिक ताण देण्याची गरज नाही. ग्रेड पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक दबाव कमी होईल.
तर विरोधकांचा युक्तिवाद आहे की, भविष्यात उच्च शिक्षण व नोकरीसाठी हिंदीचे ज्ञान आवश्यक असते. ग्रेड पद्धतीमुळे स्पर्धात्मक गुण मिळणार नाहीत.
ग्रेडनुसार गुणांचे वितरण
८० ते १०० : ए ग्रेड
५० ते ७९ : बी ग्रेड
४९ आणि त्याखाली : सी ग्रेड
Belgaum Varta Belgaum Varta