Tuesday , September 1 2026
Breaking News

शृंगेरी मतमोजणी प्रकरणात टी. डी. राजेगौडा यांना ‘सर्वोच्च’ दिलासा

Spread the love

 

भाजप उमेदवारास धक्का

बंगळूर : टी. डी. राजेगौडा यांना शृंगेरी विधानसभा मतदारसंघातील टपाली मतांच्या पुनर्मोजणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देत राजेगौडा यांना आमदारपद कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, केंद्रीय निवडणुक आयोगाला नोटीस बजावून या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ मे रोजी ठेवली आहे.

टपाली मतांच्या पुनर्मोजणी वादासंदर्भात राजेगौडा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मतमोजणीचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, यापूर्वीच्या निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राजेगौडा हेच शृंगेरी मतदारसंघाचे आमदार म्हणून कायम राहणार आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशालाही सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.

गेल्या आठवडाभरापासून या प्रकरणाची राज्यभर चर्चा होती. भाजपचे जीवराज यांनी टपाली मतांच्या मोजणीत अनियमितता झाल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने पुनर्मोजणीचे आदेश दिले होते. पुनर्मोजणीत जीवराज यांना आघाडी मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना विजयी घोषित करून प्रमाणपत्रही दिले होते.

अवघ्या चार दिवसांपूर्वीच त्यांनी आमदार म्हणून शपथ घेतली होती. मात्र, पुनर्मोजणीत त्रुटी झाल्याचा दावा करत राजेगौडा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिल्याने राजेगौडा यांचे आमदारपद पुन्हा बहाल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांच्या समस्यांवर अभ्यासासाठी मंत्रिमंडळ उपसमिती

Spread the love  परीक्षा, भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांसह शिक्षणातील सुधारणांबाबत महिनाभरात अहवाल बंगळूर : विद्यार्थ्यांच्या विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *