
धमकीचा फोन करणारा तासाभरात जेरबंद
बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान वापरल्या जाणाऱ्या मार्गावर दोन जिलेटिन काड्या आढळून आल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) पथकाने सोमवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
बंगळुरच्या बाहेरील कग्गलीपुर येथील तातगुनी परिसरात, पंतप्रधानांच्या ताफ्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गालगत जिलेटिन काड्या सापडल्या होत्या. या घटनेनंतर एनआयए पथक घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक पोलिसांकडून तपासात सहकार्य करण्यात येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
रविवारी सकाळी, कग्गलीपुरातील तातगुनीजवळ नाईस रोड जंक्शनपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर दोन जिलेटिन काड्यांचे पाकीट आढळून आले होते. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी त्या मार्गावरून जाण्यापूर्वीच हा स्फोटकसदृश साहित्य सापडल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली होती.
दरम्यान, बंगळुर शहराचे पोलीस आयुक्त सीमंत कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, तांत्रिक देखरेखीच्या मदतीने धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीला अवघ्या एका तासात अटक करण्यात आली.
रविवारी सकाळी ८.२९ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून, कनकपुर रोडवरील आर्ट ऑफ लिव्हिंग फौंडेशन परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा केला होता. पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम याच ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्यानंतर तत्काळ कोरमंगल पोलीस ठाण्याला सतर्क करण्यात आले.
तपासादरम्यान हा फोन कोरमंगलातील केएचबी कॉलनी परिसरातून आल्याचे स्पष्ट झाले. धमकी दिल्यानंतर आरोपीने मोबाईल फोन स्विच ऑफ केला होता. मात्र, पोलीसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधून काढत त्याला अटक केली.
या प्रकरणाचा तपास आग्नेय विभाग, केंद्रीय गुन्हे शाखा (सीसीबी) तसेच इतर पोलीस पथके करत आहेत. खोटी माहिती देणे, धमकी देणे आणि फसवे कॉल करणे हे गंभीर गुन्हे असून आरोपीविरुद्ध त्यानुसार कारवाई करण्यात येत असल्याचे आयुक्त सिंह यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक चौकशीत आरोपीला विविध ठिकाणी धमकीचे फोन आणि संदेश पाठवण्याची सवय असल्याचे समोर आले आहे. या कृत्यामागील हेतूचा तपासही सुरू असून, सध्या हा प्रकार खोटा इशारा असल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
आरोपीच्या मानसिक आरोग्याविषयी विचारले असता, त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून पूर्वी उपचार घेतले होते का, याचाही तपास केला जात असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील चौकशी सुरू आहे.
धमकीच्या फोननंतर सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या होत्या. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांसह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासासाठी सहा विशेष पथके स्थापन
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी सहा विशेष पथके स्थापन केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून बंगळुर दक्षिण आणि रामनगर भागातील खाणींमध्ये वापरल्या जाणाऱ्या जिलेटिन काड्यांची माहिती गोळा केली जात आहे.
पंतप्रधानांच्या आगमनाच्या दोन तासांपूर्वी वडेरहळ्ळी गेटजवळ संशयास्पद बॉक्स आढळला. बॉम्ब निकामी पथकाने तपासणी केली असता त्यात दोन जिलेटिन काड्या, अगरबत्त्या, आगपेटी आणि बॅटऱ्या सापडल्या.
दरम्यान, बॉम्ब धमकीप्रकरणी लोहित नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात त्याची मानसिक स्थिती अस्थिर असल्याचे समोर आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta