
इंधनदरवाढीवरून सिद्धरामय्या यांचा हल्लाबोल
बंगळूर : मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ३ रुपयांची वाढ करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या जगण्यावर अतिरिक्त आर्थिक ओझे टाकले असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत एक्स खात्यावर पोस्ट करताना म्हटले की, “ही केवळ दरवाढ नाही, तर देशातील सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर केलेला थेट हल्ला आहे.” परराष्ट्र धोरणातील अपयश, कमकुवत आर्थिक व्यवस्थापन आणि वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यात आलेल्या अपयशाची किंमत केंद्र सरकार जनतेकडून वसूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सिद्धरामय्या म्हणाले की, “देशाच्या जनतेच्या हिताचे रक्षण करण्याऐवजी केंद्र सरकार स्वतःच्या अपयशाचे नुकसान भरून काढण्यासाठी नागरिकांच्याच खिशाला कात्री लावत आहे.”
दरवाढीमुळे बंगळुरमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६ रुपयांच्या पुढे गेला असून डिझेलचा दर ९४ रुपयांवर पोहोचला आहे. या वाढीचा परिणाम केवळ इंधनापुरता मर्यादित राहणार नसून वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाला, फळे, दूध आणि इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढतील, असे त्यांनी म्हटले. याचा सर्वाधिक फटका कामगार, शेतकरी, लघु व्यावसायिक, गृहिणी आणि मध्यमवर्गीयांना बसणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही केंद्र सरकारने त्याचा फायदा नागरिकांना दिला नाही, उलट मोठ्या प्रमाणात कर आकारून महसूल गोळा केला, असा आरोपही त्यांनी केला. “आता तेलदर वाढताच त्याचा संपूर्ण भार सामान्य जनतेवर टाकून सरकार हात झटकत आहे. हे प्रशासन नसून जनतेचे उघड शोषण आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
रुपयाच्या घसरत्या मूल्यास रोखण्यात, महागाई नियंत्रणात ठेवण्यात आणि देशाची अर्थव्यवस्था सक्षमपणे हाताळण्यात मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत, “मोदी सरकारने उद्योगपती मित्रांप्रती दाखवलेली तत्परता आणि बांधिलकी जर थोडी जरी सामान्य जनतेप्रती दाखवली असती तर परिस्थिती वेगळी असती,” असे सिद्धरामय्या म्हणाले.
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta