बंगळूर : दहावी (एसएसएलसी), बारावी (पीयूसी) आणि पदवी अभ्यासक्रमांच्या बनावट गुणपत्रिका तयार करून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात राजा रेड्डी नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून फरार असलेल्या आणखी दोघांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरमंगल परिसरात ‘डिजिटल डिस्टन्स एज्युकेशन मिशन’ नावाचे कार्यालय सुरू करून आरोपी बनावट शैक्षणिक कागदपत्रांचा व्यवसाय करत होते. एसएसएलसी, पीयूसी तसेच विविध पदवी अभ्यासक्रमांच्या बनावट गुणपत्रिका तयार करून त्या ३० ते ५० हजार रुपयांना विकल्या जात होत्या. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक भवितव्याशी खेळ केला जात होता.
आरोपी विद्यार्थ्यांना फोन करून नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत होते. तसेच नियमित महाविद्यालयात उपस्थित न राहता पदवी परीक्षेला बसण्याची संधी मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात होते. पैसे मिळाल्यानंतर बनावट गुणपत्रिका तयार करून त्या कुरिअरद्वारे विद्यार्थ्यांच्या घरपोच पाठवल्या जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या बनावट गुणपत्रिका रॅकेटबाबत सीसीबी पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर कोरमंगलातील कार्यालयावर अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईत कार्यालयाची झडती घेऊन ५० हून अधिक बनावट गुणपत्रिका जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणी सीसीबी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या रॅकेटमागील इतर संबंधितांचा सहभाग आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून लाभ घेतलेल्या व्यक्तींचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रेन्स, कलानिकेतन, एमव्हीजे, टिपू सुलतान यांसारख्या शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याचे आश्वासन द्यायचे. एसएसएलसी आणि पीयूसीचे शिक्षण न घेताही पदवीसाठी प्रवेश देण्याचे ते आश्वासन देत असत. यावर विश्वास ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना ते एसएसएलसी आणि पीयूसीच्या गुणपत्रिका तयार करून विकायचे. या माहितीच्या आधारे, सीसीबीच्या विशेष तपास पथकाने छापा टाकला.
घरोघरी गुणपत्रिका: विद्यार्थ्यांशी संपर्क साधणारा मुख्य आरोपी राजा रेड्डी, दुसरा आरोपी आर्यन याच्यामार्फत बनावट गुणपत्रिका तयार करून डीटीडीसी कुरिअरद्वारे पाठवत असे. चौकशीदरम्यान असे उघड झाले आहे की, त्याने आतापर्यंत ५० हून अधिक विद्यार्थ्यांना बनावट गुणपत्रिका विकून बेकायदेशीरपणे लाखो रुपये कमावले आहेत. पोलिसांनी माहिती दिली आहे की, आरोपी राजा रेड्डीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta