

बेंगळूरू : विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वाढता आणि अनिर्बंध वापर आता शिक्षण व्यवस्थेसमोर गंभीर आव्हान ठरत आहे. मोबाईलच्या अतिरेकामुळे अभ्यासावरील लक्ष विचलित होत असून वाचनाची सवय, एकाग्रता, आकलनशक्ती आणि मानसिक आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निरीक्षण शिक्षण विभागाने नोंदविले आहे. ही चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने “मोबाईल सोडा, पुस्तक धरा” हे महत्त्वाकांक्षी राज्यव्यापी अभियान हाती घेतले असून, त्यासाठीचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाच्या अहवालानुसार मोबाईलचा वाढता वापर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि भावनिक विकासाला अडथळा ठरत आहे. वाचनसंस्कृती लोप पावत असून विचारशक्ती, स्मरणशक्ती आणि एकाग्रतेत घट होत आहे. मानसिक ताण, चिडचिड आणि डिजिटल व्यसनाचे प्रमाणही वाढत असल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा पुस्तकांकडे वळविणे आणि संतुलित जीवनशैलीची सवय लावणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळा, पालक आणि शिक्षण विभाग यांची संयुक्त जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या नियमित बैठका घेऊन तज्ज्ञांच्या माध्यमातून मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम समजावून सांगितले जाणार आहेत. मुलांचा मोबाईलचा वापर कोणत्या कारणासाठी आणि किती वेळ होतो, यावर पालकांनी बारकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः जेवणाच्या वेळी, अभ्यास करताना आणि झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर टाळण्यावर भर दिला जाणार आहे. पालकांनी स्वतः मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून मुलांसमोर आदर्श निर्माण करावा, त्यांच्यासोबत पुस्तके वाचावीत, संवाद वाढवावा आणि त्यांच्या ऑनलाइन तसेच ऑफलाइन सवयींवर सकारात्मक नियंत्रण ठेवावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
वाचनसंस्कृतीला चालना देणारे विविध उपक्रम
अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तकांची ओळख करून देणे, शब्दकोश, नकाशे आणि ज्ञानकोशाच्या वापरास प्रोत्साहन देणे, पुस्तक परिचय, कथा-कथन, पुस्तक परीक्षण, वाचन प्रेरणा उपक्रम आणि वाचन स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे.
याशिवाय विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी योग, प्राणायाम आणि शारीरिक व्यायामाचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या सहकार्याने मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शनही केले जाणार असून, मोबाईलच्या व्यसनातून विद्यार्थ्यांची सुटका करून त्यांच्यात वाचनाची गोडी, सुदृढ विचारसरणी आणि निरोगी जीवनशैली विकसित करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न या अभियानातून दिसून येत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta