Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक राज्यात बस प्रवास महागणार?; तिकीटदरवाढीच्या हालचालींना वेग

Spread the love

 

 

चारही परिवहन महामंडळांकडून दरवाढीचे प्रस्ताव : तज्ज्ञ समिती १५ दिवसांत अहवाल देणार

बेंगळूरू : राज्यातील लाखो प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चारही राज्य परिवहन महामंडळांच्या बस तिकीटदरात वाढ करण्याच्या दिशेने राज्य सरकारने निर्णायक पावले उचलली असून, दरवाढीचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीला अवघ्या १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा वाढलेला बोजा, बसच्या सुट्या भागांच्या किमतीतील वाढ तसेच देखभाल-दुरुस्तीवरील प्रचंड खर्च यामुळे राज्यातील परिवहन महामंडळांची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे. परिणामी, तिकीटदरवाढ हा पर्याय आता अपरिहार्य बनल्याचे मत परिवहन विभागाने सरकारसमोर मांडले आहे.

सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीसमोर प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार टाकत परिवहन महामंडळांना आर्थिक दिलासा मिळेल, अशा संतुलित दररचनेची शिफारस करण्याचे आव्हान असणार आहे.

दरम्यान, बेंगळुरू महानगर परिवहन महामंडळाने (BMTC) तब्बल ४४ टक्के तिकीटदरवाढीचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. तर केएसआरटीसीसह उर्वरित तीन परिवहन महामंडळांनी ३३ टक्के दरवाढीची मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

तज्ज्ञ समितीचा अहवाल सरकारकडे सादर झाल्यानंतर त्यावरील शिफारशींचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील बसप्रवास महागण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, सर्वसामान्य प्रवाशांचे लक्ष आता सरकारच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *