

व्हिएतनाम : पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय पर्यटकांवर मोठे संकट ओढवले आहे. व्हिएतनाममधील फु क्वोक (Phu Quoc) बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी असून काही प्रवाशांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करत स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवला असून बचावकार्यावर लक्ष ठेवले आहे. दूतावासाने प्रभावित पर्यटकांच्या मदतीसाठी हेल्पलाइनही सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बोट ओशन पियर आयलंड कंपनीची असून ती पर्यटकांना घेऊन एन थोई (An Thoi) बंदराकडे जात होती. समुद्रातील जोरदार लाटांमुळे बोट उलटल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेनंतर स्थानिक मच्छीमार आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
बचाव मोहिमेसाठी नेव्ही, कोस्ट गार्ड, दोन जहाजे आणि ३५ हून अधिक अधिकारी व सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बोटीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेमुळे भारतीय पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मृत आणि जखमींची संपूर्ण माहिती अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.

Belgaum Varta Belgaum Varta