

बेळगाव : विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील शिक्षक-भूतस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करत आहेत. मात्र, सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामातील शेतीकामांमुळे बहुतांश शेतकरी दिवसभर शिवारात असल्याने “शिवारात शेतकरी, दारात शिक्षक” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, मतदारांच्या भेटीसाठी बीएलओंना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
बेळगाव तालुक्यासह ग्रामीण भागात अलीकडील पावसानंतर भात लागवड आणि इतर शेतीकामांना वेग आला आहे. त्यामुळे अनेक घरे दिवसभर बंद असल्याचे चित्र आहे. मतदार पडताळणी, आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि अर्जांवर स्वाक्षऱ्या घेण्यासाठी जाणाऱ्या शिक्षकांना अनेकदा मतदार घरी न मिळाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एसआयआर मोहिमेचे सर्व टप्पे निश्चित मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे बीएलओंवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. दिवसभर शेतकरी शिवारात असल्याने त्यांना सायंकाळी पुन्हा घरी जाऊन भेटावे लागत आहे. एका मतदारासाठी दोन ते तीन वेळा फेऱ्या माराव्या लागत असल्याने वेळ, श्रम आणि वाहतूक खर्चातही वाढ होत आहे.
सध्या शेतीची कामे प्राधान्याची असल्याने शेतकऱ्यांना दिवसभर घरी राहणे शक्य नसले, तरी ग्रामीण भागातील नागरिकांकडून मोहिमेला चांगले सहकार्य मिळत आहे. मात्र, नागरिक ठराविक वेळेतच घरी उपलब्ध होत असल्याने मतदार पडताळणीच्या प्रक्रियेच्या गतीवर त्याचा परिणाम होत आहे.
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद व्हावी, यासाठी बीएलओ सातत्याने प्रयत्नशील असून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेची मुदत आणि खरीप हंगाम एकाच कालावधीत आल्याने ग्रामीण भागात वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूला शेतकरी पेरणी व लागवडीच्या कामात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे बीएलओ मतदार पडताळणीसाठी घराघरांत फिरत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी बीएलओंशी संपर्क ठेवून आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर केल्यास प्रक्रिया अधिक जलद आणि अचूकरीत्या पूर्ण होण्यास मदत होईल. त्यामुळे या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बीएलओ आणि मतदार यांच्यातील परस्पर सहकार्य व समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta