Sunday , September 20 2026
Breaking News

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अंतिम टप्प्यात

Spread the love

 

कोणत्याही क्षणी नवे मंत्री होणार शपथबध्द; आजी, माजी मुख्यमंत्री दिल्लीत

बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, दोन दिवसात कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. नव्या मंत्र्यांची यादी निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे (केपीसीसी) अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद हे मंगळवारी सकाळी विशेष विमानाने नवी दिल्लीला रवाना झाले.

दिल्लीत आज संध्याकाळी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेऊन नव्या मंत्र्यांची यादी निश्चित केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, रणदीप सिंह सुरजेवाला यांच्यासह पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

सध्या राज्य मंत्रिमंडळात २० मंत्रीपदे रिक्त असून, त्यासाठी ३५ हून अधिक काँग्रेस आमदार इच्छुक आहेत. त्यामुळे इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली असून, अंतिम यादी निश्चित करणे काँग्रेस नेतृत्वापुढे मोठे आव्हान ठरले आहे.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या आणि बी. के. हरिप्रसाद यांनी आपल्या समर्थक आमदारांना मंत्रिपद मिळावे यासाठी आग्रही भूमिका घेतल्याने समतोल साधणे पक्षश्रेष्ठींसाठी कठीण बनले आहे.

गेल्या आठवड्यातही या तिन्ही नेत्यांनी दिल्लीत जाऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा केली होती. मात्र, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पुत्राच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने बैठक अपुरी राहिली. त्यानंतर राहुल गांधी यांनी खर्गे दिल्लीला परतल्यानंतर पुन्हा बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे राज्यातील नेत्यांना कळवले होते.

त्याच अनुषंगाने काँग्रेस हायकमांडने पुन्हा दिल्लीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिल्यानंतर तिन्ही नेते मंगळवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने वरिष्ठ नेत्यांची बैठक संध्याकाळनंतर होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार, आजच मंत्र्यांची अंतिम यादी निश्चित होण्याची शक्यता असून, शुक्रवार किंवा शनिवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो.

इच्छुक आमदारांचा दिल्लीत तळ

मंत्रिपद मिळविण्यासाठी काँग्रेसचे ३० हून अधिक आमदार दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ नेते दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच अनेक आमदारांनी राजधानीत दाखल होऊन पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.

हायकमांडमधील आपल्या संपर्कांचा उपयोग करून मंत्रिपद मिळविण्यासाठी अनेक इच्छुक प्रयत्नशील आहेत. दिल्लीत सध्या आर. व्ही. देशपांडे, आर. बी. तिम्मापूर, बसवराज रायरेड्डी, हर्षद रिझवान, डॉ. अजय सिंह, गोपालकृष्ण बेलूर, अशोक पट्टण, आर. एस. पाटील, एन. ए. हॅरिस, टी. बी. जयचंद्र, डॉ. एच. डी. रंगनाथ, चलुवरायस्वामी, शिवानंद पाटील, नरेंद्रस्वामी, अब्बय्या प्रसाद, अल्लमप्रभू पाटील, विजयानंद काशप्पनवर, एम. वाय. पाटील यांच्यासह अनेक आमदार मंत्रिपदासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *